गेले दोन–चार दिवस सोशल मीडियावर `असिफा` ह्या आठ वर्षाच्या निरपराध मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आपण सगळेजण तिच्याबद्दल फोटो, स्टेटस आणि पोस्टी टाकून भारतीय न्यायव्यवस्थेवर, धर्माचं राजकारण करणाऱ्यांनावर आणि अप्रत्यक्षरित्या भारतीय लोकशाहीच्या स्तंभांवर आपण `बलात्कार` करत आहोत. आपण वास्तव्य करत अहो तो जगातील सगळ्यात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. आपली लोकशाही चार स्तंभांचा आधार घेत कशी बशी ताठ मानेने उभी आहे. पण जेव्हा `बलात्कारासारख्या` हिडीस घटना होतात तेव्हा हे स्तंभ एक पोकळ बांबू म्हणून लोकशाहीला टेकू देवून उभे असतात.
लोकशाहीचा चौथा स्तंभ; `प्रसिध्दीमाध्यमे`. आजकाल असं वाटतं की, जाती–धर्माची कुबड्या घेतल्याशिवाय टीआरपी वाढतच नाही. बलात्कार एका बालिकेवर झाला ह्यापेक्षा अमुक अमुक धर्माच्या मुलीवर तमुक तमुक धर्माच्या भामट्यांनी बलात्कार केलं अस सांगून आमच्यासमोर TRP ची चमचमीत थाळी वाढली जाते, आणि ती आम्ही अगदी चवीने मिटक्या मारत खातो तो विषय वेगळा. सलमान खानच्या घशाखाली एक रात्र काय तर जेवण उतरलं नाही तर आमचा सल्लू मियां आला हेडलाईन वर पण 8 वर्षाच्या पोरीसाठी 8 ओळींचा मथळा लिहिण्यासाठी ह्यांच्याकडे रिकामी जागा नसते. ते ही आम्हाला मित्राने टाकलेल्या स्टेटस वरून समजते. मग अमाची पण वाटचाल #justiceforasifa च्या दिशेने सुरू होते. अजुन तरी काय करणार हो आम्ही.
लोकशाहीचा तिसरा स्तंभ; `प्रशासन`. आता राजकारण्यांच्या रक्तातच `राजकारण` असल्याने ते बलात्कारासारख्या गंभीर विषयामध्येही आपल्या मताची पोळी भाजून घेतात. आम्ही रात्री अपरात्री मेणबत्त्या तर जाळतो पण ते अंधकारात लोटलेल्या पिडीतेच्या परिवाराला सांत्वनाच्या प्रकाशात आणण्यासाठी नाही तर मेणबत्तीच्या ज्यालाचा वापर करून विरोधी पक्षांबद्दल लोकांच्या मनात कसा जाळ पेटवता येईल ह्यासाठी जळत्या मेणबत्यांचं प्रदर्शन भरवल जातं. आणि राहिला प्रश्न सरकारच, ते पीडितेच्या कुटुंबीयांना लाखभराची पुंजी देऊन त्यापुढील कारभार न्यायपालिकेवर सोपवून आपले हात झिडकारून देते.
लोकशाहीचं सगळ्यात जास्त विश्वासपात्र स्तंभ; `न्यायपालिका`. आता तरी न्यायदेवताने डोळ्यावरची पट्टी काढावी असं वाटतं. प्रश्न असा आहे की, त्या पोरीच्या कोवळ्या मांसावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांनी क्षणाचाही विलंब केलं नाही, ना मनी कोणती लाज बाळगली मग बलात्कार झाल्यावर अशा रानटी कुत्र्यांना न्यायपालिका चार–पाच वर्ष का कुरवाळत बसते ? का फुकटची पोसते अशा नराधमाांना ? बलात्कार झाल्यावर रस्त्यावर जनतेला मेणबत्तीला माचिस लावल्याशिवाय जर त्या निरपराध पीडितेला न्याय मिळत नसेल तर संविधानाच्या पहिल्या पानावर धूळ बसली आहे असं आपल्याला नाही वाटतं?
लोकांना स्तब्ध करणारे असे आहेत हे आपले लोकशाहीचे स्तंभ. परवा ज्या महामानवाची जयंती आहे ते आंबेडकर सांगून गेले की, `आपण सगळ्यात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत`. माफ करा पण मी त्याही पुढे जावून असं म्हणतो की,` आपण एक भारतीयाच्या अगोदर एक माणूस आहोत`. तरीपण माणसासारख वागायला आपल्याला का इतकं जड जातंय हो. त्या बलात्कार झालेल्या कोवळ्या जीवापेक्षा ज्यांना खरचं आपला धर्म, जात, पंत, पक्ष इतका मोठा वाटतो त्यांनी दोन मिनिट डोळे बंद करून कल्पनेतच त्या `असिफा`च्या जागी आपल्या पोटच्या पोरीला, बहिणीला, मैत्रिणीला किंवा आपल्या ओळखीच्या कोणत्याही `ती`ला उभ करा. उत्तर नक्की मिळेल, `मानवता`पेक्षा कोनाताही मोठा धर्म नाही.
#Justice_For_Asifa..!
©मोरे_गणेश.