"चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची - लेखमाला लिहिण्यामागील भूमिका

"चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची - लेखमाला लिहिण्यामागील भूमिका
----------------------------------------------------

by - योगेश रंगनाथ निकम
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com


अर्पण
असत्याकडून सत्याकडचा, तिमिराकडून तेजाकडचा, मृत्यूकडून अमृतत्वाकडचा, अज्ञानाकडून ज्ञानाकडचा प्रवाह अखंड वाहता ठेवून मानवजातीचे व त्यायोगे समस्त विश्वाचे कल्याण चिंतनाऱ्या, त्या कल्याणासाठी मानवाकडूनच अपरिमित चेष्टा व छळ सोसणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात मानवांना अर्पण.

भूमिका
महाराष्ट्रात 2013 साली अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली व पुरोगामी मानला जाणारा महाराष्ट्र काळाच्या कितीतरी मागे जाऊन पडला. आपण सर्वांनी या हत्येच्या विरोधात मनातल्या मनात 'अरेरे' म्हटले असले तरी, ही हत्या आपण फार खळखळ न करता स्विकारली हे वास्तव विसरता कामा नये.

बौद्धिक आव्हान देण्याची क्षमता संपली की माणूस हमरीतुमरीवर येतो. त्याची पुढची पायरी म्हणजे समोरच्या व्यक्तीचे अस्तीत्व संपवणे. थोडक्यात, 'ना रहेगा बांस, ना बजेगी बासूरी'. पण सत्याचा आवाज देणारी ही बासरी वाजायची कधीच थांबत नाही. ना ती ज्ञानेश्वरांच्या काळात थांबली ना तुकारामांच्या. तशी ती दाभोळकरांनंतरही थांबणार नाही. भलेही ती ओठी धरणारांना कितीही विष पाजले जावो, ते पचवणारे निळकंठ जन्म घेतच रहातील. हा अंधाराविरूध्दचा लढा आहे आणि तो लढणारे दैदिप्यमान दिपक अखंड उजळतच रहातील.

डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासात अनेक हिंदू संघटनांची, त्यांच्या हिंदू कार्यकर्त्यांची नावे पुढे आली. अनेकांना अटकही झाली. त्यानंतरही या हत्येचा तपास पुर्ण होऊन न्यायालयाचा निर्णय येणे फारच दूरवरचे लक्ष्य दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हे सुस्पष्ट करावे लागेल की, डॉ. दाभोळकरांसोबत त्यांच्या विरोधकांचे भांडण कितीही असो परंतू त्यांची हत्या करणारे हिंदू धर्मीय असतील तर त्यांनी युध्दशास्त्राचे 'हिंदू नियम' पाळले नाहीत. घोडदळाने घोडदळासोबत, पायदळाने पायदळासोबत लढावे; असा तो साधा नियम आहे. या नियमानुसार, डॉ. दाभोळकरांसोबत जर कुणाची लढाई असलीच, तर ती फक्त आणि फक्त बौद्धिक असायला हवी होती. बंदुकांचा त्यात समावेश असण्याचे काहीही कारण नव्हते. तरी मग त्यांचा वापर का झाला?
असा कुठला आंतरिक दबाव या विरोधकांना छळतो आहे?
असा कुठला आक्रोश या विरोधकांच्या आत खदखदतो आहे?
अशी कुठली अस्वस्थता या विरोधकांमधे उसळ्या मारते आहे?
याचा विचार आपण करायला हवा.
डॉ. दाभोळकरांचे विरोधक काही मोजके का होईना, पण हिंदू धर्मीय असतील तर या अनुषंगाने आपण, वर्तमान हिंदू मानसिकतेचाही विचार करायला हवा.

आजच्या आधुनिक युगात मी हे काय 'धर्म आणि धार्मिक मानसिकता' घेऊन बसलोय असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी हे स्पष्टपणे ध्यानी घ्यावे की, धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा कुणीही आणि कितीही मारत असले तरी जगभरात धर्म आणि त्यांचे पालनकर्ते अस्तित्वात आहेतच आणि हे सत्य आपण स्विकारायला हवे. हे सत्य स्विकारल्यानंतरच आपण या विभिन्न धर्मियांमधे पारस्पारिक सहचर्य कसे वाढवता येईल, याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न करू शकतो. सर्वसाधारण मानव हा विविध विचारसारण्यांच्या चौकटीत बंदिस्त असतो हे एक वैश्विक सत्य आहे. या चौकटी ओलांडून बौध्दत्व, अर्हत्व, ब्राम्हणत्व प्राप्त करणारे मानव फारच विरळ प्रमाणात पहायला मिळाल्याचे मानवीय इतिहासात दिसून येते. अशा मानवांनी स्वत:च सर्वोच्च अवस्था प्राप्त करून इतरांना 'मानवीय जीवन' जगण्याचा मार्ग सांगितला आहे, त्यामुळे त्यांच्या कल्याणाचा विचार करणे हा आपला विषय होऊ शकत नाही. आपल्याला चिंतन करावे लागेल ते आपल्या व आपल्याप्रमाणेच चौकटीत बंद असणाऱ्या इतर मानवांच्या मानसिकतेचे व या मानसिकतेमुळे होणाऱ्या वर्तनाचे. या आधारावर, 'कुठलाही रुढ धर्म न मानणारे' तसेच 'परमेश्वर ही संकल्पना न मानणारे' लोक सुध्दा आपापल्या नाकारण्याच्या चौकटींमधे बंदिस्त आहेत. मग भलेही ते स्वत:ला विज्ञानवादी, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष अशी कुठलीही विशेषणे लावून घेत असोत.

माझी ही लेखमाला वाचून, माझ्याविषयी कुणाचे काय मत होईल हे आज सांगता येणार नाही. मला सौम्य हिंदूत्ववादी मानले जाईल वा कट्टर हिंदुत्ववादी? माझी विचारसारणी जहाल ठरवली जाईल की मवाळ? मला हिंदूत्ववादी समजले जाईल अथवा मानवतावादी? वाचक व पुढच्या पिढ्या मला नेमक्या कुठल्या चौकटीत बसवतील, किंवा चौकटीबाहेरचा समजतील? या प्रश्नांची उत्तरे भविष्याच्या उदरात बंद आहेत. असे अनेकानेक प्रश्न आजघडीला अनुत्तरित असले तरी मला एक गोष्ट निश्चितच माहिती आहे. आणि ती म्हणजे, वर्तमानकाळ हा विविध विचारसारण्यांमधील बौद्धिक विरोधाचा काळ आहे. हा बुध्दीमत्तेच्या सकारात्मक वापराचा तसेच तिक्ष्ण बुध्दी असणारांकडून केल्या जाणाऱ्या बुध्दीभेदाचा काळ देखील आहे. हा एकाच गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून पाहिल्याने सर्वसामान्यपणे जाणवणाऱ्या विरोधाभासाचा काळ आहे. आपल्याला, यासगळ्या विरोधाभासी आवरणांपलीकडील एकत्वाच्या सुत्राकडे पहाता यायला हवे.

आपल्या, पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी.

हिंदूत्वाचा विचार मांडणे म्हणजे, वर्तमानात ज्यांना बुध्दीवादी समजले जाते अशा लोकांकडून स्वत:वर संकुचितपणाचा ठपका मारून घेणे असले तरीही, त्यास अजीबात भिक न घालता मला माझी भूमिका मांडायलाच हवी. कारण, इतरांवर ठपके मारत सुटलेले तथाकथित बुध्दीवादी स्वत:च कुठल्यातरी चौकटीत बंद असल्याचे आपल्याला सहजपणे जाणवेल. आपण चौकटीबाहेरचा विचार करतो असा आभास निर्माण करून हे लोक, हजारो वर्षांपासून अस्तीत्वात असलेल्या सामाजिक सौहार्दाच्या चौकटींना उध्वस्त करण्याचे एकमेव कार्य करत आहेत. या सामाजिक चौकटी मोडून काढल्यावरच सर्व मानव सुखी होणार आहेत असा या लोकांचा, मागच्या काही शतकांपासून चुकीचा समज झाला आहे किंवा करून देण्यात आला आहे.

ज्या मानवांनी स्वत:च्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून घेतलेली असते, ते मोजके लोक निवाऱ्यांचा त्याग करून निळे आकाश असणाऱ्या प्रकृतीच्या हाती स्वत:ला सहज सोपवत असतीलही. परंतू, सर्वसामान्य मानवाला रहाण्यासाठी घर हवे असते. त्या घराला किमान एकतरी चौकट असते. घराशिवाय आणि चौकटीशिवाय त्याला असुरक्षित वाटते. हाच नियम मानवाच्या आंतरीक विचारप्रक्रीयेच्या बाबतीतही लागू होतो. सर्वसामान्यपणे सहज आयुष्य जगताना विचारधारांच्या विविध चौकटी निर्माण होतात. त्यामागे असलेल्या प्रथा-परंपरांच्या- मान्यतांच्या घरात रहाणे मानवाला सुरक्षित वाटते. अर्थात, वेळच्या वेळी साफसफाई झाली नाही तर कालौघात या घरांमधे जळमटंही निर्माण होत असतात. अशा घरात जन्म घेणाऱ्या ज्या पिढ्यां-पिढ्या या जळमटांसोबत लहानच्या मोठ्या व वृध्द होत असतात त्यांना आपल्याला लाभलेल्या प्राचीन घराच्या वारशासोबत त्याच्या चौकटींचा व सगळीकडे पसरलेल्या जळमटांचाही अभिमान वाटू लागतो.  विचारधारांच्या अशा घरात जन्म घेणाऱ्या काही थोड्याश्या  लोकांच्या मनात मात्र घराची साफसफाई करावी लागणार असल्याची जाणीव जन्म घेते. याच थोड्याश्या विशिष्ट लोकांना आपण संत व समाजसुधारक म्हणून ओळखतो. आपापल्या जाणीवांद्वारे मनात उमटू लागलेल्या वर्तुळांच्या परीघात या सुधारकांचे स्वच्छतेचे कार्य सुरू असते. कुणाचा परीघ आपल्याला लहान किंवा मोठा दिसत असेलही. परंतू या परिघांच्या व्याप्तीच्या आधारे या सुधारकांच्या कार्याचा लहान-मोठेपणा ठरवता येत नाही. कारण, सगळ्यांच्या कार्याचे मूळ एकाच गोष्टीत असते. ती म्हणजे जाणीव. ही जाणीव असते 'घर स्वच्छ करण्याची'. साफसफाईच्या या प्रक्रीयेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सुधारकांपैकी, ‘कुणीही घर मोडण्याचा प्रयत्न करत नाही'. आणि हाच तथाकथित बुद्धिवादी आणि सुधारक यांच्यामधील सर्वात मोठा फरक होय.

वरील बाब लक्षात ठेऊन, आज आपल्याला वर्तमान हिंदू मानसिकतेचा विचार करावा लागेल. मध्ययुगीन चालीरीतींना काळाच्या पडद्याआड फेकून देणाऱ्या संत व समाजसुधारकांची मोठी परंपरा हिंदू धर्मात व विशेषतः महाराष्ट्रात आहे. त्या त्या वेळच्या आंधळ्या धर्माभिमान्यांनी या संत व समाजसुधारकांचा छळ केला हे ही खरेच आहे. पण तरीही, या सुधारकांना तेव्हा अशिक्षित असणाऱ्या बहुसंख्यक हिंदूंनी मोठ्या प्रमाणात स्विकारले होते हे ही वास्तव आहे. भलेही या निरक्षर हिंदू जनतेने या संतांच्या प्रत्येक वचनाचे तंतोतंत पालन केले नसेल, पण त्यांच्या मनात या संतांप्रती नितांत आदर व प्रेम होते व आजही आहे. आपल्या विचारांमध्ये व त्याद्वारे वागण्यात बदल करून शेवटी कधीतरी आपल्याला संतांनी सांगितलेल्याच मार्गावरून चालायचे आहे, हे जवळपास सर्वच हिंदूंना मान्य आहे. मग आता असे काय झाले आहे की, सुधारणेचा कुठलाही विचार हिंदूंना आपल्या धर्मावरील अतिक्रमण वाटतो आहे? ते त्याविरुद्ध पेटून उठत आहेत? समाजसुधारणा करू पहाणारांना नाकारत आहेत?

हा विचार करताना, 'कुणीतरी माथी भडकवायचे कार्य करते आहे' एवढे तकलादू उत्तर देऊन चालणार नाही. आपल्याला वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, घर शाबूत ठेवून ते सुंदर करण्यासाठी झटणारे 'संत व समाजसुधारक' आणि घरच तोडू पहाणारे 'तथाकथित बुद्धीवादी' यांच्यातील फरक समजावून घ्यावा लागेल. या दोन भिन्न प्रकृतीच्या मानवांमधील सीमारेषा पुसट तर होत चालल्या नाहीत ना? याचे चिंतन करावे लागेल. जर त्या तशा पुसट होत चालल्या असतील तर त्यांना ठळकपणे अधोरेखित करावे लागेल. कारण, तसे झाले नाही तर आपण पुढच्या काळात 'सकारात्मकता व नकारात्मकता', 'सुष्ट व दुष्ट', 'चांगले व वाईट' यातला फरक करणेच विसरून जाऊ. ज्याची सुरवात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येने झाली आहे.

वाद - प्रतिवाद असणारच आणि असायलाच हवेत. विचार करण्याची क्षमता लाभलेल्या मानवाचे ते सर्वोच्च वैशिष्ट्य आहे. पण, आपण या वाद - प्रतिवादांमधूनही संवाद साधण्याचाच पर्याय शोधायला हवा. कारण, 'अधोगतीकडून उन्नतीकडे जाणे' हे ही मानवाचेच वैशिष्ट्य आहे आणि संवाद, हा नेहमीच उन्नतीचा मार्ग आहे.

ज्या पृथ्वीतलावर मानवाचे अस्तित्व आहे त्या धरतीमातेला क्षणभराच्या अवधीमधे नष्ट करता येईल, इतके अणुबॉम्ब मानवानेच निर्माण करून ठेवलेले असताना 'शस्त्रांद्वारे खेळल्या जाणाऱ्या लढाईला तसा काहीही अर्थ राहिलेला नाही'. तरीही मानव एकमेकांविरुद्ध लढणारच नाही, अशी भाबडी आशा बाळगण्यातही काही शहाणपण नाही. त्यामुळे, आजच्या काळात मानवाला लढायचेच असेल तर, त्याने आपल्या बुध्दीने लढणे आवश्यक आहे. आपल्या बौद्धिक लढाईमुळे निर्माण होणाऱ्या गदारोळाचा विचार करता मला वाटते की आपण, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या बुध्दीमत्तेवर सार्थ विश्वास ठेवायला हवा. आपण हा विश्वास ठेवायला हवा की आपले वंशज, आपल्या पूर्वजांच्या विविध मत-मतांतरचा अभ्यास करून त्यातील ‘योग्य तेच’ उचलतील.

माझा, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या बुद्धिमत्तेवर ठाम विश्वास आहे. आपलाही असेलच.             या विश्वासासोबतच, ही लेखमाला लिहिण्यामागची भूमिका इथेच थांबवण्यासाठी आपली परवानगी घेतो. पुढच्या लेखांपासून आपण, 'तिमिरातुनी तेजाकडे' या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाच्या आधारे “चौकट” अंधश्रध्दा निर्मुलनाची समजावून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच त्या अनुषंगाने "हिंदू धर्मीयांमधील अस्वस्थतेच्या कारणांचा शोध" घेऊया.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.