*नाण्याची एक बाजू* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------
by - *योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com
21 डिसेंबर 2018
खरे तर माणसाच्या वर्तमान विचार, कृती, कर्तृत्वावर इतिहासाच्या पुर्व संचिताचा प्रभाव असतो. त्यामुळे, ऐतिहासिक जाणिवा विस्मृतीत गेल्या की, गतकाळच्या चुकांमधून शिकणे जसे दुरापास्त होत जाते तसेच भविष्यकालीन वाटचालीस, पुर्वजांकडून मिळणारा आपलेपणाचा भरभक्कम व समृध्द पाठिंबा सुध्दा शिल्लक रहात नाही. या प्रक्रियेत एकतर, गतकाळच्या चिरेबंदी वाड्यांच्या भिंतीना लिंपून काढणारे वारसदार न उरल्याने त्या वाड्यांचे हळूहळू भग्नावशेषात रूपांतर व्हायला लागते. किंवा मग, पुर्वजांनी केलेलं पक्कं बांधकाम कर्मठपणे ताठच उभं असलं तरी, त्याच्याशी आत्मियता असलेल्या वंशावळी कधीच्याच नष्ट झालेल्या असतात. याचे उदाहरण म्हणून आपण अनुक्रमे अमेरिकेतील ‘माया संस्कृती’ व इजिप्तची ‘मिस्त्र संस्कृती’ यांचे उदाहरण डोळ्यांसमोर आणू शकतो.
*‘जंबूमहाद्वीपातील मानवाचा अर्थात भारतीय उपखंडातील लोकांचा म्हणजेच हिंदूंचा मूळ सर्वसमावेशक स्वभाव आणि वर्तमानात घडत असलेल्या घटना’ यांचा विचार, आपल्याला वरील संदर्भात करावा लागेल.* कारण प्रश्न शेवटी, 'आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कुठला वारसा सोडून जाणार आहोत?' यासंबंधी आहे.
ज्या भारताची 'नागरिकांना राज्य करण्याचा अधिकार देणारी' वर्तमान राज्यव्यवस्था त्याच्या 'अतुल्य संविधानावर आधारित' आहे त्या संविधानास जाळणारांकडे दुर्लक्ष करणारे महामुर्ख म्हणून भविष्यात आपल्याला ओळखले जावे?, कि पारतंत्र्यात असलेल्या आपल्या पुर्वजांना परकीय सत्तेविरुद्ध एकत्रित होऊन लढण्याची प्रेरणा देणाऱ्या, जाज्वल्य देशभक्ती जागृत करणाऱ्या, मातृभूमीसाठी हसत हसत आपले बलिदान देण्यास उद्युक्त करणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताला विरोध करणारांकडे मूकपणे पहाणारे शतमूर्ख म्हणून आपल्याला ओळखले जावे? हे आपल्याला ठरवावे लागेल.
ज्या 'वंदे मातरम्' ने प्रेरीत होऊन आपल्या पुर्वजांनी स्वातंत्र्याचा लढा दिला व तो जिंकून आपल्यासाठी 'संविधानावर आधारित' वर्तमान लोकशाही व्यवस्था निर्माण केली, त्या आपल्याच पुर्वजांना आपण वेड्यात काढणार आहोत का? हे आपल्याला ठरवावे लागेल.
*‘वंदे मातरम्’ला ज्यांचा विरोध होता ते भारतातून आपला वाटा-हिस्सा घेऊन 1947 साली इथून निघूनच गेले आहेत. ज्यांना भावा-भावाप्रमाणे एकत्र रहाणे मान्य नव्हते त्यांनी आपल्या अगणित देशबांधवांचे मुडदे पाडून 1947 साली स्वत:ची वेगळी चूल मांडलीच आहे. भारताच्या भूमीवर जवळपास आठ-नऊशे वर्ष राहिल्यानंतरही ज्यांना आपल्या धार्मिक आस्था भारतीय मातीपेक्षाही जास्त महत्वाच्या होत्या ते आपल्या धार्मिकतेच्या कुंपणात 1947 साली बंदिस्त झालेलेच आहेत.*
हे संदर्भ इथे उधृत करण्याचे कारण एवढेच की, *विसर पडत चाललेल्या किंवा आतापर्यंत उच्चार न केलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. आणि ती गोष्ट म्हणजे, '1947 साली भारतातून निघून न जाता जे इथेच थांबले आहेत ते भारत भूमीस एकसंध ठेवणाऱ्या राष्ट्रीय अस्मितांचा आदर करतात आणि त्या अस्मितांचा धर्म/ पंथ/ जात/ वंश या सर्व भेदकारक गोष्टींपलीकडे जाऊन स्विकार करतात' हे गृहीत धरलेले आहे.* आणि याच गृहीतकावर, प्रत्येक भारतीयाने 'संविधानाद्वारे दिला गेलेला आपापल्या धर्माच्या पालनाचा अधिकार' तपासून पहायचा आहे. या धार्मिक अधिकाराच्या हननाची मोठ्याने ओरडून द्वाही फिरवण्याआधी, *'धर्म म्हणजे कर्तव्य'* ही जम्बूद्विपातील म्हणजेच भारतीय उपमहाद्वीपातील संस्कृतीच्या लाखो वर्षांच्या संचितांतून उत्पन्न झालेली व्याख्या, नीटपणे समजून घेणे आवश्यक आहे.
*भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या अधिकारांचा उच्चार करण्याआधी, भारत या राष्ट्राप्रती असलेल्या त्याच्या वैयक्तिक कर्तव्यांची जाण असलीच पाहिजे. ज्या कुठल्या प्रेरणा व अस्मितांच्या आधारावर हा देश हजारो वर्षांपासून एकसंध राहिला आहे, त्या राष्ट्रीय संचीताचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि त्याने ते पार पाडायलाच हवे.*
'भारताचे संविधान व वंदे मातरम्' यांसारख्या अनेकविध अस्मिता 'दर तीन कोसांवर बदलणारी भाषा असलेल्या' विशालकाय भारतीय उपखंडाच्या एकसंधपणासाठी आवश्यक राहिल्या आहेत.
भगवान राम असोत की भगवान बुद्ध, भगवान महावीर असोत की वंदनीय गुरूनानक जी... ही सर्व भारतीयांसाठी समान रितीने प्रेरणास्थाने आहेत. किंबहुना प्रेरणास्थानांपेक्षाही मोक्षस्थाने आहेत. 'जय श्रीराम' म्हणा की 'नमो बुध्दाय', 'नमो अरिहंताय' म्हणा की 'सत श्री अकाल' वरील कुठलेही शब्द उच्चारले तरी सर्व भारतीयांच्या अंत:करणात सारखीच शांतता नांदू लागते. या असीम शांतीचे मुळ, भारतीयांच्या भौतिकतेविरूध्द नैतिकतेमधे आहे. भौतिक जगताच्या आकर्षणाविरूध्द अंत:स्थ जगताच्या ओढीमधे आहे. अमर्यादित उपभोगाविरूध्द त्यागामधून आलेल्या तपोबलामधे आहे. म्हणूनच जम्बूद्विपातील लोकांना लाखो वर्षांचा मानवीय प्रवास करून आल्यानंतरसुध्दा, आजही अकल्पित सुखसोयी उपलब्ध करून देणाऱ्या विज्ञानाऐवजी 'ब्रम्हज्ञानाचा मार्ग' दाखवणाऱ्या संतांच्या, भिख्खुंच्या, मुनींच्या, संन्याशांच्या, गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावेसे वाटते.
तथाकथित अंधश्रध्दा निर्मुलनवाल्यांना, तथाकथित बुध्दीवाद्यांना, तथाकथित पुरोगामीपणाचा टेंभा मिरवणारांना, तथाकथित विज्ञानवाद्यांना वाटतो तसा हा भारतीयांचा मुर्खपणा खचीतच नाही. हा बौद्धिक जगताची सीमा संपल्यावर जे प्रश्न सुरू होतात, त्या प्रश्नांचा विचार करण्याचा सर्वोच्च शहाणपणा आहे, ही मानवाला मिळालेल्या बुध्दीच्या देणगीची सर्वोच्च प्रेरणा व त्या प्रेरणेद्वारे केल्या जाणाऱ्या आंतरीक प्रवासाची सर्वोच्च प्रज्ञा आहे. हेच बौध्दत्व आहे. हेच अर्हत्व आहे. हेच ब्राम्हणत्व आहे.
याच तत्वांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतवर्षात भिख्खुंनी प्रवास केला, गुरूंनी पायपीट केली, श्रमणांनी दिक्षा दिल्या, ऋषींनी पाठ घेतले. याचाच परिणाम म्हणून विविध विचारधारांच्या तत्वज्ञांद्वारे या संपूर्ण देशात धर्मसभा घेण्यात आल्या, धर्मचर्चा घडवून आणण्यात आल्या, तिर्थस्थळांची उभारणी झाली, धर्मग्रंथांची निर्मीती झाली. या सर्व विचारधारांमधे कुठल्याही प्रकारचे भांडण नसून, कुठल्याही प्रकारचा वाद नसून, कुठल्याही प्रकारचा विरोधाभास नसून एक आपलासा करणारा संवाद आहे. भारतीय उपमहाद्विपात उदयास आलेल्या विविध विचारधारांचे अध्ययन करणाराला त्या सर्वांतून एकाच गोष्टीची सुस्पष्ट जाणीव होते आणि ती म्हणजे, 'पोहोचण्याचे मार्ग भिन्न असले तरी गंतव्यस्थान एकच आहे'. 'आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, विश्व म्हणा, ध्वनी म्हणा, शुन्य म्हणा, काहीही म्हणा किंवा काहीच म्हणू नका, प्राप्त होणारी उपलब्धी एकसमान आहे. या उपलब्धीची आस, भारतीय उपखंडात जन्म घेणाऱ्या सर्वांना समान आहे. या उपलब्धीप्रती सर्व भारतीयांची समान आस्था आहे.
वरील विस्तृत विवेचनाद्वारे सांगायचे एवढेच की, 'अंतस्थ जाणीवांची एकसमान आस्था' असणारे लोक ज्या भूमीवर रहातात त्या अतिप्राचीन भूमीप्रती, त्या भूमीवर हजारो वर्षांपूर्वी उदयास आलेल्या 'भारतवर्ष' या राष्ट्राप्रती, भारत या राष्ट्रात शतकानुशतके निर्माण होत आलेल्या व होत असलेल्या राष्ट्रीय अस्मितांप्रती *सर्व भारतीयांची समान भावना* आहे. आणि ती भावना म्हणजे, *'भारताच्या या विविध राष्ट्रीय अस्मितांनी भारतवर्षला लाखो वर्षांपासून एक राष्ट्र म्हणून आपलेपणाच्या एका सुत्रात घट्ट धरून ठेवले आहे' हा विश्वास होय.*
त्यामुळे, 'संविधान आणि वंदे मातरम्' यांसारख्या विविध राष्ट्रीय अस्मितांचा आदर व सन्मान राखणे तसेच या राष्ट्रीय अस्मितांना पायदळी तुडवू पहाणारांच्या विरोधात एकविचाराने एकत्रीत येऊन लढा देणे हे प्रत्येक भारतीयाचे मुलभूत कर्तव्य असून प्रत्येकाने ते पार पाडायलाच हवे.
या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काळाच्या दिर्घ ऐतिहासिक पटलावर जन्मलेल्या आपल्या विविध अस्मिता, जो समाज अधुनिकतेच्या व पुरोगामित्वाच्या नावाखाली विस्मृतीत टाकून देतो त्या समाजाचे सांस्कृतीकदृष्ट्याही खच्चीकरण झालेले असते. *आपल्या पुर्वजांचं 'जुणं शहाणपण' हे मुर्खपणा होतं असं मानून 'सगळंच नाकारणाऱ्या' समाजाने मानवजातीच्या हितकारक भवितव्यासाठी असे कुठले नवे आदर्श, असे कुठले नवे मार्ग शोधून काढले आहेत जे पुर्वी अस्तित्वात नव्हते, याचा स्वत:ला पुढारलेले समजण्याआधी सखोल व गंभीर विचार करावा लागेल.*
खरेतर ‘सत व असत’, ‘सकारात्मकता व नकारात्मकता’ या सदासर्वकाळ एकाचवेळी अस्तित्वात असणाऱ्या बाबी आहेत. त्यापैकी कुठल्या बाजूच्या गोष्टी ज्या त्या मर्यादित काळाच्या पटलावर उठून दिसतील, हे त्या काळातील प्रभावी माणसांवर अवलंबून आहे. आणि नकारात्मकता धरून ठेवणाऱ्या प्रभावांपेक्षा सकारात्मक मुल्यांचाच मानवाने नेहमी स्विकार केला आहे हे त्याच्या पृथ्वीतलावरील आजपर्यंतच्या वाटचालीतून दिसून आले आहे. नाहीतर आपल्या अकारण अहंकारी दांभिक वृत्तीच्या स्वार्थपुर्ण समाधानासाठी मानवाने आतापर्यंत इतकी युध्दे केली आहेत, इतका काळोख पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, की त्याची वंशावळ काळाच्या उदरात कधीचीच गुडूप व्हायला हवी होती. पण या लेखात मांडलेले विचार लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपण अजूनही अस्तित्वात आहोत याचा अर्थ एवढाच आहे की, सत्याने नेहमीच असत्यावर विजय मिळवलेला आहे आणि हे शाश्वत सत्य मानवासोबत कायम असणार आहे.
या पहिल्या लेखाचा शेवट करतेवेळी ठळकपणे अधोरेखित करायचे ते एवढेच की, या जगात दुष्ट शक्ती नेहमीच थोड्या होत्या, थोड्याच आहेत आणि थोड्याश्याच असणार आहेत. त्यांना आपल्या काळापलीकडे फेकून देण्यासाठी गरज असते ती फक्त सुष्ट वृत्तींनी एकत्र येण्याची. *एकदा का सुष्ट वृत्ती एकत्र आल्या, की मग दुष्टांनी अंधारापासून बनवलेली हत्यारे मोडून पडण्यास फार वेळ लागत नाही कारण प्रकाशाच्या लोळांसमोर उभे रहाण्याची ताकद त्यांच्यात अजिबातच नसते.*
पृथ्वीमातेवरील आपल्या जन्मापासून जगाच्या विविध भागांमध्ये मानवाने निर्माण केलेल्या जवळपास सर्वच ‘सभ्यता’ ‘कालाय तस्मे नम:’ झाल्या आहेत. काळाच्या या विशालकाय जबड्यापासून फक्त आणि फक्त आपण भारतीयच वाचलो आहोत आणि त्याचे कारण, ‘आपला सर्वसमावेशक स्वभाव’ आहे. ‘आपल्याला स्वीकारणे माहिती आहे’ नाकारणे नव्हे. हा ‘स्वीकार भाव’ हे जन्मजात वैशिष्ट्य असणार्या आपल्या या मूळ स्वभावाला लाभलेला, भारतीयत्वाचा चेहरा छिन्नभिन्न करू पाहणार्या आंतरिक व बाह्य शक्ती हे *'भारतासमोरील वर्तमानाचे सर्वात मोठे आव्हान'* आहे. या आव्हानाचा विचार आपण पुढच्या लेखात करू.
तोपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचे ते एवढेच की, ‘भारतीयत्वाचा चेहरा छिन्नभिन्न करणे शक्य होईल’ ही भारतासमोर आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या शक्तींची घोर अंधश्रद्धा असून आपण भारतीय, या अंधश्रद्धेचे निर्मूलन निश्चितच करणार आहोत. गरज आहे ती फक्त ‘एकजुटीने लढा देण्याची’.