दुष्काळाशी दोन हात..

          १ मे महाराष्ट्र दिनी पानी फाऊंडेशनने महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास बदलण्यासाठी सुरु केलेल्या जलसंधारणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रमदान करण्याचा योग याही वर्षी आला. ठिकाण सिन्नर तालुक्यातले कोनांबे गाव. हा विचार मागच्या वर्षी औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातल्या किनगावात श्रमदान करतानाही आला होता की या अजस्त्र मोहिमेत नाशिकचा समावेश असायलाच हवा. सुदैवाने तो योग यावर्षी जमून आला. 

         मागच्या वर्षी मी माझी पत्नी वृषाली व आमची मैत्रिण स्वप्ना असे तिघे होतो. यावर्षी मात्र स्वप्नाचा ८ वर्षाचा मुलगा अनुज व आमची सव्वा वर्षाची (संभवतः सर्वात कमी वयाची) कन्या पीहू अर्थात रायमादेखील होती.

          मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कामाचा आवाका आणखी खूप मोठा. चार हजारापेक्षा जास्त गावं काय अन त्या प्रत्येक गावाकडे अगदी जातीने लक्ष पुरवून प्रत्येकाला या राष्ट्रकार्यात सामील करून घेण्यासाठी चाललेली धडपड काय. अगदी गावागावात जाऊन जमिनीवर बसकण मारून अमीर, किरण, सत्यजित, जितेंद्र जोशी व अन्य सेलीब्रेटींचे गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या मनांची मशागत करणे काय, हल्लीच्या काळात अशी अत्यंत दुर्लभ दृश्ये पाहायला मिळण्याचे, त्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभते आहे ते केवळ पानी फाऊंडेशनच्या टीममुळे, टीमवर्कमुळे. याव्यतिरिक्त तूफान आलंया कार्यक्रमात  आमिरला मराठी बोलताना ऐकणं हा सुखद अनुभव आहे. किरणजी देखील यावर्षी भरपूर मराठी बोलताहेत.  

            या मोहिमेत आश्चर्याने तोंडात बोटं घालावी अशा असंख्य गोष्टी आहेत. प्रायोजक सोडून इतर कोणाकडूनही एकही पैसा न घेणे. दुफळीने गांजलेल्या महाराष्ट्रातल्या गावागावात पाणीप्रश्नासाठी लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करून, ऐक्य घडवून आणणे, याशिवाय महाराष्ट्रभर पाणी बचतीचे शास्त्रशुद्ध व मोफत प्रशिक्षण देणारी ५७ प्रशिक्षण केंद्रे सुरु झाली आहेत.प्रत्येकाला समानतेची व सन्मानाची वागणूक. पाय धुवून, गळाभेट घेऊन प्रशिक्षणार्थीचे स्वागत करणे.सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोनांबेच्या ग्रामस्थ व जलमित्रांना संबोधित करताना सत्यजित भटकळ म्हणाले तसे, ‘ही निव्वळ भाषणबाजी करणारी, केवळ समाजमाध्यमांवर फोटो अपलोड करण्यासाठी किंवा पर्यावरण रक्षणाची कोरडी चर्चा करण्याची मोहीम नाही. ही प्रत्यक्षात जमिनीवर उतरून कुदळ फावडे हातात घेवून दुष्काळ हटवण्यासाठी उभी केलेली लोकचळवळ आहे.’

       महाराष्ट्र ही संतांची, सुधारकांची भूमी. पण अलीकडच्या काळात व्यापक समाजकार्याची धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी चाललेला नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा असो किंवा काही शेतक-यांची आंदोलने अशी मोजकीच उदाहरणे होती. परंतु ग्रास रूट लेवलवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर श्रमशक्तीद्वारे इतके रचनात्मक कार्य आतापर्यंत बघण्यात आलेले नव्हते. बरं त्यात पुन्हा आम्ही करतो आहोत हाही अभिनिवेश नाही.‘तुम्ही करा आम्ही पाठीशी नव्हे प्रत्येक पावलावर सोबत आहोत’ हा अत्यंत आश्वासक संदेश. त्याला माध्यमाची जोड. (तुफान आलंया ही मालिका व सामाजमाध्यमे या मोहिमेत जनभागीदारीसाठी महत्त्वाची ठरताहेत.)

         एखाद्या सामाजिक कार्याला माध्यमांची योग्य साथ मिळाल्यावर आणखी गती येते याशिवाय एखाद्या यशस्वी माध्यमकर्मीने, सेलिब्रेटीने त्यात स्वतःचे योगदान दिले तर समाजात एक चांगला संदेश जातो. याठिकाणी तर या कार्याच्या मुळाशी आहे ख-या नायकाचे गुण अंगी असलेला, प्रगल्भ सामाजिक जाणिव असलेला एक मोठा सुपरस्टार, आणि नुसता मुळाशीच नव्हे तर सपत्नीक प्रत्येक टप्प्यावर आहे सोबत. स्वतःचं प्रसिद्धीचं वलय बाजूला ठेवून करतोय गावागावात पायपीट. भटकतोय उन्हातान्हात वणवण. गावक-यांसोबत खातोय,पितोय. गावक-यांच जगणं समजून घेतोय. हाही एक चमत्कारच. 

       चित्रपटात आपण हिरोचं औदार्य, त्याचा इतरांना मदत करण्याचा स्वभाव पाहून भारावून जातो व प्रत्यक्ष जीवनातही त्या कलाकाराला आपण हिरोचा दर्जा देतो. पण ज्यांना समाजाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव आहे समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे असे किती कलाकार असतील. त्यामुळेदेखील आमिरचं महत्त्व. पण या मोहिमेत त्याने सर्वसामान्यांपासून तहसीलदार, जिल्हाधिकारी, कमिशनर, उद्योगपतींसोबत कलाकारांचीही फौज उतरवून या मोहिमेला एक वेगळाच आयाम दिला आहे. या दोघांच्या १०० टक्के सोबत आहे विविध ज्वलंत सामाजिक प्रश्नांची मांडणी करणा-या, त्या सोडवण्यासाठी प्रात्यक्षिकांसह चर्चा करणा-या अत्यंत उपयोगी अशा ‘सत्यमेव जयते’ या मालिकेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ व त्यांची टीम.  

       नियोजन कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणूनही या मोहिमेकडे पाहता येईल. मुळात मोहिमेचा व्यापच अवाढव्य. त्यात जवळपास प्रत्येक गावात गांवक-यांकडून प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात झालेली.मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी शहरी मंडळींना सामावून घेण्यासाठी महाश्रमदानाचे नियोजन. यावेळचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मोहिमेत सहभागी होण्या प्रत्येक शहरवासियाचा ‘जलमित्र’ नावाने सन्मान. त्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था. नोंदणीसाठी आमीरजींसह संस्थेच्या टीम तर्फे आवाहन. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चार हजार गावांमध्ये श्रमदानासाठी नाव नोंदणी केलेल्या लाखो जलमित्रांच्या माहितीचे विश्लेषण करून त्यांना आवडीच्या तालुक्यातले गाव श्रमदानासाठी निश्चित करणे. हे कामही संस्थेच्या टीमने लीलया पार पाडले. कोणतीही चूक न होऊ देता एसेमेस व इ मेलद्वारे सगळ्यांपर्यंत निरोप तर पोहोचवलेच. शिवाय दररोज सातत्याने फॉलो अपही घेतला. श्रमदानासाठी येताना काय काळजी घ्यायची हेही सांगितले. प्रत्येकाला गावापर्यंत पोहोचण्याचा गुगल मॅपही पुरवलेला. पण गावातल्या दुर्गम भागात नेट जोडणी नसेल याचा विचार करून गावागावात प्रत्यक्ष श्रमदानाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर दिशादर्शक फलक लावलेले. दुचाकी, चारचाकी वाहने श्रमदानाच्या ठिकाणी नीट पोहोचावी म्हणून कच्च्या रस्त्यांची निर्मिती केलेली.जागोजागी हसतमुख स्वयंसेवक मार्गदर्शनासाठी उभे.गाड्या पार्क करण्यासाठी सुसज्ज जागेची व्यवस्था केलेली. जवळच फिरत्या शौचालयांची व्यवस्था. आधीपासूनच सीसीटी खणनासाठी डोंगर उतारावर ठिकठिकाणी मार्किंग केलेलं.थंड पाण्याची, अल्पोपहाराची व्यवस्था केलेली. 

           पश्चिमेला मावळण्यासाठी सज्ज पौर्णिमेचा वाटोळा चंद्र व पूर्वेकडे सूर्यदेवाचं झालेलं आगमन. गार वा-याच्या झुळका, गोधनाच्या गळ्यातल्या घुंगराचा मंजुळ स्वर, ताज्या शेणाचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट हे सारे अनुभवत श्रमदानाच्या ठिकाणी पोहोचण्याचा आनंद निराळाच. गावाच्या वेशीवर स्वागत फक्कड चवीच्या अमृततुल्य चहाने. रात्रंदिवस मेहनत करून गावक-यांनी जलमित्रांसाठी बनवलेल्या नव्या कच्च्या रस्त्यावरून आम्ही चारचाकीने आरामात श्रमदानाच्या ठिकाणी डोंगर रांगेपाशी जाऊन पोहोचलो. विशेष म्हणजे आमच्या आधीपासूनच त्या ठिकाणी ‘साथी हाथ बढाना’ म्हणत प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात झालेली होती. एकीकडे नोंदणीसाठी झुंबड उडालेली. नोंदणी करायला चक्क स्वतः भटकळ सर आणि किरण मॅडम. छोटी जलमित्र पिहूचे किरण मॅडमनी मनःपूर्वक स्वागत केले. भटकळ सरांनी जलमित्र मोहिमेतला आमचा व्हिडियो आवडल्याचे आवर्जून सांगितले.

         जलमित्रांना सीसीटी बनवण्यासाठी मार्किंग केलेल्या विविध प्लॉट्सवर आठ-आठच्या गटांना कुदळी, फावडे, घमेले व सोबत दोन स्थानिक गावकरी देण्यात येत होते. 

       अत्यंत शिस्तबद्ध कार्य. आज राजसत्ताही लोकांना शहरांकडे चला असे आवाहन करीत असताना महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हा मंत्र देवून शहरी लोकांनाही मोहिमेत सामावून घेतल्याने गावातल्या लोकांचे जगणे, त्यांच्या समस्या यांच्याशी शहरवासीयांची तोंडओळख झाली. अज्ञात भारत शहरी भागाला थोडासा कळला. अन्यथा किरणजी म्हणाल्या तसे ‘पानी कहाँसे आता है?’ उत्तर ‘नलसे,’ ‘खाना कहाँसे आता है?’ उत्तर ‘मार्केट से.’ ही आपली उत्तरे. त्यामुळे या मोहिमेचे हे विशेष योगदान. किरणजी पुढे म्हणाल्या, मी स्वतःला भाग्यशाली मानते की गावात राहून हे अनुभवण्याची मला संधी मिळाली. तेव्हा ठरवले की आम्ही सर्व जण गावात येऊन, गावक-यांच्या खांद्याला खांदा लावून काम करूया आणि पाहूया काय घडेल? एकट्या कोनांबे गावच्या एका वेळच्या श्रमदानाने ११ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता प्राप्त केली आहे. आज आमची स्वप्नपूर्ती होण्याच्या मार्गावर आहे. 

      याला चमत्कार मानायला हरकत नाही कारण राधिका उर्फ अनिता म्हणाली की वाईट कार्यासाठी माणसं जमवणं अवघड नसतं पण चांगल्या विधायक कार्यासाठी लोक लवकर एकत्र येत नाहीत. पण जल संवर्धनाच्या या महाकार्यासाठी आपापसातले सर्व मतभेद विसरून गावकरी एकत्र येताहेत. गावागावात ऐक्याचे चित्र निर्माण होते आहे आणि त्याद्वारे नवभारताची उभारणी होते आहे. 

      हे माझं काम आहे, आणि मला ते करायचंच आहे ही जिद्द पानी फाउंडेशनने ज्यांना प्रशिक्षण दिलंय (तब्बल वीस हजार) त्या प्रत्येकाच्या मनात इतकी खोलवर रुजवली आहे की त्यांच्यामुळे गावागावात प्रेरणादायी, गमतीशीर उदाहरणं पाहायला मिळताहेत. प्रत्यक्ष कामासाठी प्रेरित करतानाच आपल्या घोषणांनी आसमंत दुमदुमवून टाकणा-या भामा आजी, आपल्या सुरांनी रणांगण पेटवणारे दिव्यांग बंडू भाऊ, नुकत्याच बाळंत झालेल्या एका गोड बाळाची आई वंदना लोखंडे यांचे कंबर कसून पुन्हा श्रमदान सुरु आहे. आपल्या बळावर त्या बालपणापासूनच श्रमसंस्कार करताहेत. त्याचबरोबर आठ महिन्याच्या गर्भवती असताना सोनदाबीच्या अनिता साबळे आपले भोग मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून जिद्दीने प्रशिक्षण घेतले.  मुलगी झाल्यावर घ्यावी लागलेली काही दिवसांची अपरिहार्य विश्रांतीही त्यांना आता अस्वस्थ करते आहे, तर घरी नातेवाईकांचे निधन झालेले असताना त्यांच्या उत्तर कार्याचा खर्च या मोहिमेसाठी दिला जातोय. स्वतःचं दुःख विसरून लोक या महाकार्यात सामील होताहेत. कुठे अक्खा गाव ‘अन्न गुड गुडे’ चा नारा देवून रात्री बाराच्या ठोक्याला श्रमदान सुरु करून दुष्काळाला ढिश्क्याव,ढिश्क्याव,ढिश्क्याव करतोय तर एक हात नसताना सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त पात्रेवाडीचा अमर पवार या देशकार्यासाठी पूर्ण जोमाने सज्ज झालाय. गावक-यांची म्हणावी तशी साथ मिळत नसतानाही, एका हाताने काम करताना खूप वेदना होत असतानाही दुष्काळाविरुद्ध च्या या लढाईत तो आशेने कार्यरत आहे. 


  खैरी गावच्या अश्विनी, अंकिता, किरण, सुनिता व समीना या पाच पांडविनींनी गांव पाणीदार करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. कुठे गावक-यांचा अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने पानी फाऊंडेशनचं प्रशिक्षण घेऊन आलेले कार्यकर्ते एकट्याने किल्ला लढवायला सुरुवात करताहेत आणि हळूहळू दृष्टीकोनात फरक पडल्याने गावक-यांचे संपूर्ण सहकार्यही मिळवताहेत. तर शहादा उमठा सारख्या काही ठिकाणी मात्र अख्खा गाव श्रमदान स्थळी पूर्णवेळ मुक्काम ठोकून कार्यरत आहे. पिंपरी कळम सारख्या गावात, गावातली वानरसेनाही या उन्हाळ्याच्या सुट्टीत सीसीटीच्या ताली बनवत आहे.खारीचा वाटा उचलत आहे. श्रमदानासाठी गमतीशीर ऑफरही दिल्या जाताहेत. गुरधाळ गावाचे गोविंद नरवटे श्रमदान करणा-यांची दाढी व कटींग मोफत करून देताहेत.


          तांत्रिक गोष्टीत रस असणारा,सामाजिक भान असणारा १३ वर्षाचा पूर्वज इंजिनियरच्या थाटात गावक-यांना मार्गदर्शन करतोय तर शहरातल्या आपल्या कामातून ब्रेक घेऊन गावाला पाणीदार करण्यासाठी परतलेल्या रुईच्या विद्या घाडगे यांनी अवघ्या ९३० रुपयात हायड्रोमार्कर बनवला आहे.आणि याच गावाच्या सैनिकांनी सुटी टाकून दुष्काळाशी युद्ध पुकारलय, आपल्या श्रमदानाने गावाचा कायापालट सुरु केला आहे.धानोरे गावातल्या पल्लवी वाघ व प्रतीक्षा देशमुख या सावित्रीच्या लेकींनी स्वतः प्रशिक्षण घेतल्यावर गावक-यांना व्हिडियो दाखवून जलसाक्षर करण्याचा वसा घेतला आहे. बनारसचे अनिलकुमार गोपुस गावात जनजागृतीसाठी कुंचल्याचा वापर करताहेत. चित्रकारीतेच्या बळावर, गावातल्या भिंतींवर पाणी बचतीसाठी पेंटिंग करून गावक-यांमध्ये पाणीबचत व श्रमदानाविषयी जागृती घडवून आणताहेत. वैजापुरचा छोटा सार्थक शोषखड्डयासाठी उपोषणाचे अस्त्र परजून आपली मागणी मान्य करवून घेतोय तर पातुर्डा खुर्द गावच्या सरपंच अर्चना झाडोकार जलक्रांती करण्यासाठी अन्य समाजातल्या वृद्ध महिलांचे पाय धुवून जातीपातीतले वैर संपवून, दोन समाजातली दरी मिटवून आपल्या गावाला जलसमृद्ध करण्यासाठी झटताहेत. आमिरजींनी म्हटल्याप्रमाणे एक तांब्या पाणी सगळयांना समान पातळीवर आणू शकतं. अशी जी गावं आहेत ती आलरेडी विनर आहेत. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. 

         शासनाकडून अशा प्रकारचं कार्य ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणच आहे गाव करील ते राव काय करील? पण इथे गम्मत अशी की ‘राव’ गावक-यांकडून चोख कार्य करवून घेताहेत. असो गमतीचा भाग सोडला तरी या मोहिमेत ज्या-ज्या म्हणून गोष्टी केल्या जाताहेत त्यांचा वेग हा प्रचंड आहे. श्रमशक्तीची प्रचिती आणून देणारा आहे. इथे सरकारी काम आणि ६ महिने थांब अशी स्थिती असल्याने शासकीय यंत्रणेकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही किंबहुना या मोहिमेतून हाच संदेश सगळ्यांनी घ्यायला हवा की आपला विकास, आपल्या गावाचा विकास जेवढा आपल्याला म्हणजे गावक-यांना जिव्हाळ्याचा विषय वाटतो तेवढा तो कागदावर चालणा-या सरकारी यंत्रणेला वाटण्याची शक्यता नाही. त्यामुळे श्रमदानाचा हा कित्ता भविष्यात गावांनीच नव्हे तर शहरांनीही गिरवण्याची गरज आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता मुळातूनच बदलून टाकण्याची गरज आहे. 

       सामाजिक कार्याची खूप आवड असणा-या संवेदनशीलअभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, सुरुवातीला मलाही साशंकता होती या मोहिमेविषयी, मोहिमेच्या यशाविषयी. पण विश्वासही होता की ज्या मोहिमेचा चालक ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आहे. ती मोहीम परफेक्ट असणारच.  

       पानी फाऊंडेशनची ही अजस्त्र मोहीम म्हणजे एक अतिभव्य असा यथार्थवादी सिनेमा तयार होतो आहे आणि गावंच्या गावं, तिथले गांवकरी, जलमित्र, व या मोहिमेशी जोडला गेलेला प्रत्येकजण त्यात आपापली भूमिका निभावत आहे. हा सिनेमा किती कोटीचा व्यवसाय करील माहित नाही. पण अब्जावधीचे पाणी उपलब्ध करून देऊन उद्याच्या महाराष्ट्राचं चित्र मात्र नक्कीच पालटवून टाकेल. दगड धोंड्यांच्या या प्रदेशाला सुजलाम-सुफलाम करून टाकेल यात तिळमात्र शंका नाही. आतापर्यंत १ मे हा जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जात होता मला वाटते आता यानंतर हा दिवस ‘महाश्रमदान दिवस’ म्हणूनही ओळखला जावा. 

        महाराष्ट्राला दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी आरंभलेल्या या महाश्रमदान मोहिमेत यावर्षी तब्बल ४ हजाराहून जास्त गावांचा असलेला समावेश आणि दरवर्षी वाढत जाणारा व्याप त्यामुळे हे अवाढव्य सेवाकार्य संपूर्ण जगाच्या समोर येण्याची गरज आहे. गिनीज बुक, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस यांनी स्वतः हून या कार्याची दाखल घ्यायला हवी. अभिनेते आमीर खान व पानी फाऊंडेशन यांचा नोबेल, मॅगेसेसे अशा जागतिक पुरस्कारांनी गौरव व्हायला हवा असे मनापासून वाटते.

                    

डॉ. रज्जाक शेख

डॉ. वृषाली र.शेख  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.