एकांगी दृष्टीकोण अंनिसचा ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची)

एकांगी दृष्टीकोण अंनिसचा ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------

by - योगेश रंगनाथ निकम
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com 
01 डिसेंबर 2018

ही लेखमाला लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करतेवेळी उल्लेख केल्याप्रमाणे, आपण ‘तिमिरातुनी तेजाकडे' या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाच्या आधारे “चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची समजावून घेण्याचा, तसेच त्या अनुषंगाने “हिंदू धर्मीयांमधील अस्वस्थतेच्या कारणांचा शोध" घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रयत्न मुख्यत्वे, ‘जे हिंदू दाभोलकरांच्या कार्याने अस्वस्थ होत होते' त्यांची मानसिकता समजून घेण्याचा आहे‌. यातीलही बहुतांश हिंदू हे, ‘समाजातील बुवाबाजी तसेच लोकांना फसवणाऱ्या रस्त्यावरच्या भोंदू बाबांपासून ते पंचतारांकीत गुरूंविरोधात डॉ. दाभोलकरांनी जे कार्य चालवले होते त्याच्या विरोधात नव्हते' तसेच 'ते सुशिक्षित, विवेकी आचरण करणारे असून भडकवले जाण्याच्या कक्षेपलीकडे होते' हे पक्के ध्यानी धरावे लागेल. अन्यथा आपण, ‘मनामनात दाटलेली अस्वस्थता आणि प्रत्यक्षरित्या होणारा टोकाचा विरोध’ यात सरमिसळ करून बसू. गुंता होण्याची जिथे शक्यता आहे ती जागा आधीच हेरून ठेवल्यानंतर, आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूयात. ‘हिंदू समाजातील काही लोक, जर डॉ. दाभोलकरांच्या कार्याने अस्वस्थ होत होते, तर या अस्वस्थतेमागची कारणे नेमकी काय होती?’ चला, एकेक गाठ सोडवायला घेऊयात.

डॉ. दाभोलकरांच्या 'तिमिरातुनी तेजाकडे' या पुस्तकाच्या 'विचार' या भागात एक प्रकरण ‘अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?’ या प्रश्नावर आधारीत आहे. याच प्रकरणापासून आपण सुरवात करणार आहोत.

वरील प्रश्नाचा संदर्भ देऊन डॉ. दाभोलकरांनी, “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो.” या मांडणीची चौकट उभारली आहे. जे या चौकटीतून वरील प्रश्नाकडे पहातील, त्यांना डॉक्टर जे म्हणताहेत ते 100% खरे वाटेल.

पण,
डॉ. दाभोलकरांच्या चौकटीमुळे,
A. वरील प्रश्न विचारण्यामागील मानसिकता एवढीच आणि अशीच असते का?
B. वरील प्रश्न विचारणारांवर एकांगी दृष्टीकोणाची चौकट तर लादली गेली नाही?
C. वरील प्रश्न विचारणाऱ्यांना सरळ सरळ एकाच चौकटीत बसवून त्यांच्यावर अन्याय तर केलेला नाही? आणि
D. अशाप्रकारे 'एकच प्रश्न विचारणाऱ्या विविध मनोवृत्तीच्या लोकांना एकाच चौकटीत बसवले जात असेल' तर हा अवैज्ञानिक व अविवेकी दृष्टीकोण नाही का?
हे उप-प्रश्न निर्माण होतात. या उप-प्रश्नांना खालील उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया व त्यानंतर मुख्य प्रश्नाकडे वळूया.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील जिंतूर येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभुमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला तसेच त्यावेळी शाकाहारी व मांसाहारी भोजनावर आडवा हात मारला. आपण केलेल्या या कार्याची बातमी त्यांनी विविध वृत्तपत्रांतून छापूनही आणली. बातमीमध्ये साधारणपणे असे म्हटले होते की, ‘स्मशानभूमीबाबत समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हे कार्य केले गेले.’
अर्थातच, अनेक लोकांच्या बुद्धीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे कार्य पटले नाही. त्यांनी त्याविषयी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांकडून स्मशानभूमीचे शुद्धीकरण केले गेले तसेच अंनिसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल केले गेले. या सगळ्या घडामोडींचा आपल्या तात्विक चर्चेशी विशेष संबंध नाही. पण या उदाहरणाद्वारे निर्माण होणारे खालील प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत व त्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे.

1. ‘स्मशानभूमीत जाऊन भोजन घेतल्याने आपली स्मशानाविषयीची अंधश्रद्धा दूर झाली’ हे आपण एकवेळ सत्य जरी मानले, तरी त्याने काय साध्य होईल? तुम्ही व मी आपल्या मुलाबाळांसोबत, पाच-पंचवीस नातेवाईक जमवून एखाद्या सुटीच्या दिवशी स्मशानात जाऊन सहभोजन घेणार आहोत का? की एखाद्याच्या डोक्यात उद्या स्मशानात चमचमीत व खमंग पदार्थांचे हॉटेल उघडण्याचा विचार निर्माण होईल? त्या हॉटेलची जाहिरात कशी असेल? ‘भीती सोडून भूताची, चव घ्या कोंबडीची’ अशी?

खरे तर मानवाचा विवेक जोपर्यंत जागृत आहे, तोपर्यंत असे काहीही होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशनातील भोजनाच्या अशा कितीही पंगती उठवल्या, तरी त्याचा स्मशानाला पिकनिक स्पॉट बनवण्यासाठी काहीही उपयोग नाही.

2. घरात प्रेत असताना ते टिकवून ठेवण्यासाठी, त्यावर सतत औषधी तेल चोळण्याची प्रथा पूर्वीपासून बहुतांश समाज/धर्मांमधे अस्तीत्वात आहे. आज शितकरण पेट्या घरी आणून नातेवाईक येईपर्यन्त मृतदेह टिकवून ठेवला जातो. येथे हा, टिकवून ठेवणे शब्द फार महत्वाचा आहे. कारण त्यामागे, ‘प्राण निघून गेलेला देह हा ताबडतोब सडायला सुरवात होते’ हे वैज्ञानिक कारण आहे. असा सडत चाललेला मृतदेह घरात असताना काही खाण्याची इच्छा मानवाला होत नाही, हे त्याच्या आंतरिक जाणीवेतून आलेल्या सुजानतेचे लक्षण आहे. मग तोच मृतदेह ज्या ठिकाणी नेऊन जाळला किंवा पुरला जातो अशा ठिकाणी, म्हणजे “स्मशानात” जाऊन खाण्यापिण्याची भावना त्याच्या मनात निर्माण होणे शक्य आहे काय?

3. स्मशान.. जाणे अपरीहार्य असले, तरी ज्या ठिकाणी मनुष्य जाऊ इच्छित नाही अशी जागा. इतरांसाठी का होईना जेंव्हा तिथे जावे लागते तेव्हा कुठल्याही साधारण मनुष्याच्या ठिकाणी, क्षणभरासाठी का होईना वैराग्याची भावना जन्म घेते. पण, प्रत्येकजण हा काही या भावनेने प्रेरित होऊन लगेच संसार सोडून वैराग्याच्या मार्गाने जाऊ शकत नाही. त्याने जाऊही नये. मुद्दा असा की, सारखे सारखे स्मशानात जात राहिल्याने “वैराग्य भावना” वाढीस लागून, जास्त लोक त्यांची संसारीक कर्तव्ये सोडून भटकत फिरायला लागतील, ज्यामुळे, कुठल्याही समाज व्यवस्थेचा सुरळीत गाडा विस्कळीत होऊ शकतो. म्हणूनच सर्व जाती/ धर्म/ पंथ/ संप्रदायातील मानवांनी आतापर्यंत स्मशानापासून दोन हात लांब अंतर राखले असावे. हे एवढे साधे तत्वज्ञान आहे.

काळाच्या प्रवाहात गावाबाहेर असलेली स्मशाने आपोआपच गावकूसच्या आत आली आहेत. स्मशानाशेजारी उभ्या राहिलेल्या मोठमोठ्या इमारतींमधे लाखो परिवार संसार करत आहेत. स्मशानासमोरून जाणार्‍या हमरस्त्यांवर न थांबणारी वर्दळ वाढली आहे. या सगळ्यातून लोकांची भुता-खेतांविषयी भीती आपसूक नाहीशी झाली आहे किंवा होत आहे. त्यासाठी, विशेष काही कष्ट कुणाला करावे लागलेले नाहीत व करण्याची आवश्यकताही नाही. असे असताना अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावाखाली चाललेले हे उपद्व्याप योग्य आहेत का?

4. एखाद्या शहरातल्या हमरस्त्याशेजारी असलेल्या स्मशानातून भूते - हडळी मध्यरात्री बाहेर येऊन रस्त्याच्या मधोमध 'झिंगाट' नाचताना कुणी पाहिली आहेत काय? रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्यात सहभागी होण्यासाठी कुणी खेचून नेत आहे का? का स्मशानजोगी आपल्या स्मशानातल्या जगण्याच्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवून सोडत फिरत आहेत?

सांगायचे एवढेच की, स्मशान, त्यातली भूते किंवा स्मशानाशी संबंधीत लोक हे समाजाच्या मनात स्मशानाविषयी अंधश्रध्दा पसरवण्याचे कार्य आजघडीला तरी करताना दिसत नाहीत. (कुणी सांगावे, कदाचित ते अंधश्रध्दा विरोधी कायद्यालाही घाबरत असतील.) मग तरीही स्मशानावर 'अंधश्रध्दा निर्मुलनवाल्यांचे अतिक्रमण' कशासाठी होत आहे?

उलट मानवी मनाच्या ठायी असलेल्या 'भिती' या भावनेचा आधार घेत अनेकदा चित्रपट व मालिकांमधून स्मशान, भूते व त्यांच्याविषयीच्या अंधश्रध्दा पसरवून गल्ले भरले जातात. असे असताना, या प्रकारचे चित्रपट व मालिका बनवणारांना 'अंधश्रध्दा विरोधी कायद्याच्या आधारे' चतूर्भुज करण्याचे महान कार्य न करता, माणूस मेल्याशिवाय गपगुमान ओसाड पडून असणाऱ्या स्मशानाच्या व त्यात नसणाऱ्या गरीब बिच्चाऱ्या भूतांच्या मागे अंनिसवाले का म्हणून लागले आहेत?
असो.
वरील प्रकारच्या विविध प्रश्नांचा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की, या प्रश्नांचा हिंदू धर्माशीच काय, कुठल्याही धर्माशी अजीबातच काही संबंध नाहीये. हे प्रश्न कुठल्याही धर्माच्या लोकांना पडू शकतात.
आणि जर असे प्रश्न विविध धर्माच्या लोकांना पडणार असतील तर आपल्याला, लेखाच्या सुरवातीला उपस्थित झालेल्या उप-प्रश्नांचे उत्तर मिळते.

A. “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी" वरील प्रश्न विचारलेले नसून कुठल्याही विवेकी मानवाच्या मनात निर्माण होणारे हे साधे सरळ तात्विक प्रश्न आहेत. त्यामुळे,
B. “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी प्रश्न उपस्थित केले जातात” असे म्हणून ‘प्रश्न विचारणार्‍यांवर’ एकांगी दृष्टीकोण लादण्याचा हा प्रकार आहे व त्याद्वारे,

C. ‘प्रश्न विचारणार्‍यांवर’ अन्याय केला गेला आहे. तसेच,

D. विज्ञान भलेही भौतिक जगतातील कुठल्याही क्रियाकलापांचे स्पष्टीकरण देत असेल परंतु, मानवाच्या मनोजगताचे काय? त्याचे उत्तर देणे विज्ञानाला शक्य नाही. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. एकाच घरातील दोन मुलगे A व B हे, त्यांच्या आई-बाबांसोबत रात्री झोपण्यासाठी पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये जातात. A सहा वर्षांचा आहे व B त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. रात्री मुलांना झोपवण्यासाठी अंगाई म्हणणे, गोष्ट सांगणे, दरवाजाबाहेरील बागुलबुवाची भीती दाखवणे इत्यादि गोष्टी त्यांच्या जन्मापासून सारख्याच घडल्या आहेत. सकाळी आई-बाबा व A लवकर उठून खाली आलेले असल्यास, उशिरा उठणार्‍या B ला एकटेपणाचे भय वाटत नाही. याउलट हेच A च्या बाबतीत घडल्यास त्याला मात्र एकटेपणाची भीती वाटते. A चे हेच वागणे जेंव्हा तो B च्या वयाचा होता तेव्हाही असेच होते. या उदाहरणाद्वारे निर्माण होणार्‍या, ‘एकाला भीती का वाटते व दुसर्‍याला का वाटत नाही?’ या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर काय असेल? सगळी भौतिक परिस्थिती समान असतानाही हे होत असेल, तर या दोन मुलांकडे कुठल्यातरी एकाच चौकटीतून पाहणे योग्य ठरेल का? विज्ञानामधे एकाच गोष्टीला एकच तत्व लागू होते. उदा. पाणी म्हणजे H2O. पण मनोजगताच्या बाबत असे होत नाही. त्यामुळे एकाला भीती वाटण्याचा जो काही सिद्धान्त असेल तो दुसर्‍याला लागू पडत नाही. तेथे प्रत्येकाकडे असणार्‍या विभिन्न मनांचा सिद्धान्त लागू होतो. त्यामुळे, 'एकच प्रश्न विचारणाऱ्या परंतु विविध मनोवृत्तीच्या लोकांना एकाच चौकटीत बसवले जात असेल, तर हा सुद्धा अवैज्ञानिक दृष्टीकोण आहे,’ हे सहज स्पष्ट होते.

आता, ‘हा दृष्टीकोण अविवेकी कसा?’ हे या लेखात विस्तृतपणे स्पष्ट केलेलेच आहे. तरीही हे स्पष्टीकरण अपुरे वाटत असल्यास अंनिसच्या कार्यकर्त्यांना भविष्यात आणखी एक प्रयोग करता येईल. तो प्रयोग कुठला? हे या लेखमालेतील पुढच्या लेखात पाहूया व त्याचवेळी, "अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?" असा प्रश्न विचारण्यामागे जी अस्वस्थता आहे तिचाही शोध घेऊया.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.