Imageप्रेषक
निसर्गराजा
मु .हरित नगरी
पोस्ट वृक्षवल्ली नगर
ता .धरा
जि वसुंधरा सृष्टी
प्रिय मनुजा,
अनेक शुभाशीर्वाद.तुझ्यासाठी मी अनेक भेटवस्तू पाठवल्या आहेत .त्या तुला मिळत असतीलच हे मला नक्की माहीत आहे .तुझी काळजी करता करता मी स्वतः ला पुरता विसरून गेलोय बघ .आता थोडा अशक्तपणा जाणवत आहे ,ग्लानि आल्यासारखी वाटतेय .तुझ्या आधाराची गरजआहे मला. म्हणून हाती घेतलंय हे पत्र  लिहायला.
मी तुला तळहाताच्या फोडावानी जपले आणि तू माझ्याशी एवढा निष्ठुर का रे वागतो आहेस!!! आता हेच बघ ना. माझी वनराई तुला सावली , लाकुड,फळे- फुले, औषधी देतात आणि तू मात्र  स्वतः च्या फायद्यासाठी त्यांची कत्तल चालवली आहेस. अरे! अशीच वृक्षतोड सुरु राहिली तर तुलाच उन्हाचा त्रास होईल. मग शीतल छाया कशी मिळणार? रसरशित फळे कोठुन खायला मिळणार?प्रसन्नतेसाठी फुलांचा सुगंध कुठून आणशील? त्यामुळे जरा सावर आणि समजून घे माझे महत्त्व.तुझे घर जर कोण्या कारणाने उध्वस्त झाले तर तू किती रडतोस!!! मग माझ्या नसण्याने माझे प्राणी , पाखरे,कीटक कुठे राहतील बरे?? मीच त्यांचा आसरा,निवारा,घर आहे.  मी नष्ट झालो तर ते तुला दिल्याशिवाय राहतील का?
माझ्या कुशीत शांत पहुडलेला निळा,अथांग समुद्र तुला कधीच काही मागत नाही. तू मात्र त्याला नेहमी त्रास देतोस. घाण पाणी,कचरा ,प्लास्टिक पिशव्या व बॉटल्स आणि तेलकट तवंग यामुळे तो नीट श्वासही घेऊ शकत नाही. समुद्र एकटा दिसत असला तरी अनंत जीवांचा तो पालनकर्ता आहे. तोच असा दूषित झाला तर जे जलचर आहेत त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल...तुला देखील साज शृंगारासाठी रंगीबेरंगी खडे, प्रवाळ,मोती मिळायचे नाहीत.स्वतः साठी म्हणून तरी तू या सागरी संपत्तिचा सांभाळ कर. खळखळ करीत हुंदडणारा खोडकर ओढा, वळणे घेत झुळझुळ वाहणारी अल्लड नदी ,शांत नि पोक्त विहिरी हे सारेजण मिळून तुझी तहान भागवतात आणि तू त्यांनाच छळतोस ! कधी कधी तर तुझ्या या वेडेपणाची दया येते.
वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची गरज भासू लागली,घरे कमी पडू लागली.शेती विकून उंचच उंच इमारती बांधल्या. शेतीचे क्षेत्र कमी झाले म्हणून उत्पादन कमी झाले आणि आता तर धान्य आयात करायची वेळ आली. माझे डोंगर तू भुईसपाट केलेस. तिथेही वस्ती करून राहायला लागलास. असे करून तू तुझा विनाश ओढवून घेत आहेस.
राहण्यासाठी ,जागेसाठी बेसुमार वृक्षतोड झाली अन् पावसाचे प्रमाण कमी झाले.पाऊस कमी झाला म्हणून शेतीचे उत्पन्न कमी झाले.का समजत नाही तुला ते?
मनुजा,अजूनही तू तुझे असे अनिर्बंध वागणे थांबवले नाहीस तर तुझेच नुकसान होणार आहे.  माझी हानि होताना पाहून माझे घटक गप्प बसणार नाहीत. भूकंप अतिवर्षण ,अनावर्षण, त्सुनामी, पूर ,दुष्काळ
अशा अनेक मार्गांनी त्यांनी वचपा काढलाय.
पण तुला अजूनही ते कळत नाही.
म्हणूनच सांगतोय,आता तरी जागा हो मनुजा. हे सगळे दुष्कृत्य थांबव.झाडे लाव,पाणी अडव,पाणी जीरव,पर्यावरणाचे रक्षण कर,संवर्धन कर.यातच तुझे कल्याण आहे.
लक्ष देऊन ऐक जरा-
कावळा करतो काव काव
म्हणतो माणसा झाड लाव.
शेवटी एकच सांगतो की सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी म्हणून तू सर्वश्रुत आहेस .थोडा समजदार बन आणि मला जरा आधार दे.
तुझ्याच सेवेत
निसर्ग
प्रति,
मनुज
मु.पो.परिसरपुर
ता.पृथ्वीतल
जि.अवकाशनगर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक पत्र माझे
शीला अम्भुरे बिनगे
( साद)
परतुर ,जालना