Image

     काल सकाळी लाल सुंदरीने कॉलेजला सवारी चालली होती. गर्दी कमी असल्याने विंडो सीट मिळाली, त्यामुळे पाठीला ताण देत, पायावर पाय टाकले आणि मुंडकी ४५ अंशात बाहेर वळवली. सकाळचं आल्हादायक वातावरण असल्याने आपसूकच डोळ्यांच्या बाहुल्या बाहेरील निसर्गात विलीन झाल्या. वाऱ्याची मंद झुळूक, डोंगराच्या अडोशातून सुर मारणारी सूर्याची किरणं, आंब्याचा मोहक मोहोर आणि जीवानीशी चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या. अशा प्रकारे निसर्ग आपल्याच धुंदीत मग्न झाला होता. आणि मनात विचार आला की खरचं महाराष्ट्रच्या नंदनवनाला शोभेल असाच थाट आहे आपल्या कोकणचा. कॉलेज मध्ये तीन–चार लेक्चर्सची गोळा बेरीज करून पुन्हा स्वारी घराच्या वाटेवर निघाली.

     कॉलेजमधून घरी परतताना पुन्हा अपेक्षेप्रमाणे विंडो सीटच्या शेजारी ढुंगण टेकायला जागा मिळाली. गर्मीच्या मोसमात विंडो सीट मिळणे म्हणजे आमच्यासाठी तो `शिवशाही`चाच थाट असतो. नेहमीप्रमाणे डोळे बाहेर वटारले. पण दिसावं ते काही भलतच. चित्रकाराने मेहतीने चित्र काढल्यावर अनावधानाने पाण्याने भरलेल्या पेला त्या चित्रावर पडण्यासाठी मुकावा आणि थोड्याच वेळात ते चित्र `पाण्यात अखंड मिसळून` जातं त्या प्रमाणे आगीचे रौद्र रूप निसर्गाला काळ्या भुकटीत विलीन करत होत. रस्त्याच्या दुतर्फा हे चित्र होत. हृदयाच्या भावना कोलमडून पडल्या होत्या म्हणून स्तब्ध झालेलं डोळे मेंदूला प्रश्न करू लागले; हेच आहे का आपले ते सकाळचं स्वप्नातलं नंदनवन ?  नंदनवनाच  आता `काळ`वंदवन तर होत नाही ना?  कोकणाच्या सौंदर्याबद्दल इतर वेळी ताशेरे पिटवनारे आपण अश्या वेळी कोठे शेपूट घालून बसतो ? असे एक ना अनेक प्रश्न डोळ्यांमार्फत मेंदूवर उमटत होते. न्हावी वस्तरा मारून शेंबड्या पोराचं जसं टक्कल पाडतो तसं आगीमुळे सारा डोंगर उघडा पडत होता.

    काय वाटलं असेल त्या चिमुकल्या पिल्लांना जे आकाशाला आपल्या पंखांनी गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी घेऊन आले होते. काय वाटतं असेल त्या पिल्लांच्या आईला जीला फक्त चार दिवसांचा मातृसहवास लाभला असेल. काय वाटलं असेल त्या आदिवासी बांधवांना, ज्याची आर्थिक पुंजी वनात मिळणाऱ्या `रानमेव्यावर` अवलंबून असते. रानात लागलेली आग तर शमली पण आता त्यांच्या पोटातली अन्नाची आग कशी शमणार. काय वाटलं असेल त्या शेतकर्याला ज्याचा हौसा दोन मिनिटात होत्याचा नव्हता झाला.  वणव्यात असं बरंच काही होत जे ऐकून, वाचून, पाहून आपलं काळीज करपटून जाईल. पण जोपर्यंत त्या वणव्याच्या झळा आपल्या दैनंदिन आयुष्याला  लागत नाही तोपर्यंत हे सगळं आपल्यासाठी कल्पनेतलेच गणित असतं.

    संध्याकाळी ‎हे सगळं एका कोल्हापूरच्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा ती जे वाक्य बोलली ते अगदी पांढऱ्या रस्सा प्रमाणे होत, रुचकर होत पण तितकंच झणझणीत. म्हणाली ``तुम्ही कोकणवाले किती नशीबवान आहात ना; तुमच्याकडे वणवे लागतात (म्हणजे वणवे लागण्याईतकी नैसर्गिक साधनसंपत्ती तरी तुमच्याकडे आहे ) आमच्याकडे वणवे नाही लागत , आणि  तुम्ही कोकणवाले किती कुचकामी आहेत ना, म्हणजे फुकटात मिळालेल्या ह्या निसर्गाचं तुम्ही साधं संवर्धनही करू शकत नाही. तुमच्या कडे `चणे` तर आहेत पण ते चणे  चावण्याईतक सामर्थ्यही तुमच्या `दाता`मध्ये नाही आहे.``

 ‎    वणवा हा जरी शास्त्रीय व्याख्येप्रमाणे झाडांच्या फांद्यांमुळे  होत असलेल्या घर्षणामुळे होत असला तरी, वणवा लागण्यात सिगारेटचा झुरका मारून थोटक न विझवता फेकणाऱ्या वाटसरुंची महत्त्वाची भूमिका असते.वणवा कोणत्याही कारणाने लागला तरी तो विझवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या खाजगी संपत्तीचे ज्या आकांताने आपण संरक्षण करतो त्याच प्रमाणे नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे महत्त्वाचे आहे. 

       आज पुन्हा तीच वाट, फरक फक्त इतकाच होता.  काल लाल सुंदरीसमावेत निसर्गसुध्दा घावत होता. आज सुंदरी धावतेय, निसर्ग तिथेच `निस्तेज` अवस्थेत...

©मोरे_गणेश.