Image

जर्मन कोड्याची भारतीय मिमांसा
(चौकट अंधश्रद्धा निर्मूलनाची)

by - योगेश रंगनाथ निकम
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com 
20 फेब्रुवारी 2019

माननीय #हेमंत_कर्णिक यांच्या डी.पी. वरून योग्य अंदाज बांधला असल्यास मी त्यांना ‘काका’ म्हटलेलं वावगं ठरणार नाही. अर्थात, कुठलेही नाते जोडायच्या उद्देशाने नाही तर आमच्या वयातील अंतराच्या दृष्टीने. हे अंतर मुद्दाम अधोरेखित करण्याचेही विशिष्ट कारण आहे आणि ते म्हणजे, माझ्या मागच्या पिढीतील हेमंत कर्णिक यांना, त्यांनी इतकी वर्ष मनात बाळगलेलं #जर्मन_कोडं आता अचानक सुटू लागल्यासारखं वाटत असेल तर, तो त्यांचा अतिशय गंभीर असा गैरसमज आहे. आणि ते, माझ्या पिढीपुढे असलेल्या भारतीय कोड्यांचे चिंतन करण्याऐवजी, भारतातील सद्य परिस्थितीची 1933 मधील जर्मनीशी असुसंगत अशी सांगड बिनधास्तपणे घालत आहेत. हा जरा आंतरराष्ट्रीयच घोळ झाला. नाही का?

माझ्या पिढीपुढे असलेली भारतीय कोडी काय आहेत ? हे पुढे मी विस्ताराने लिहिणारच आहे. त्याआधी आपण, हेमंत कर्णिक यांच्या उडालेल्या जागतिक गोंधळाची जरा विस्तृत अशी #भारतीय_मीमांसा करूया.

क्रमांक 1.
पहिल्या महायुद्धात अंगभंग झालेला जर्मनी 1933 पर्यंत अपमानाने पोळतच होता आणि त्यांचे राज्यकर्ते यासंबंधी विशेष काही करू शकतील असे जर्मन नागरिकांना वाटत नव्हते त्यामुळे त्यांनी नवा राज्यकर्ता निवडला.
परंतु,
स्वतंत्र भारताची परिस्थिती अशी नव्हती. आपल्या मातृभूमीची शकले झाली असली हा अपमान गिळून व विभाजनाचे क्रौर्य विस्मृतीत टाकून, भारतीय नागरिकांनी ही शकले स्वीकारणाऱ्या महात्मा गांधींच्या अनुयायांनाच आपले नेते मानले व त्यांनाच सत्तास्थानी बसवले. इतकेच नाही तर, भारताचा राज्यकारभार गेली साठ-सत्तर वर्षे स्वत:ला ‘गांधींचे अनुयायी’ म्हणवून घेणार्‍यांनीच चालवलेला आहे. आणि, आत्ताच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांत त्यांनी मारलेली मुसंडी पहाता, येत्या लोकसभा निवडणुकीत ते सत्ताधार्‍यांना तुल्यबळच असणार आहेत.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा वरीलप्रमाणे राजकीय आढावा घेतल्यास आपल्या हे निश्चित लक्षात येईल की, जर्मनीमध्ये 1933 मध्ये जे सत्ता परिवर्तन झाले त्या मागील पार्श्वभूमीचा व भारतातील सद्य परिस्थितीचा सुतभरही संबंध नाही.

क्रमांक 2.
1933 ला जर्मनीमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यावर पुढे युरोपमध्ये जो वंशवादावर आधारित अमानवी हिंसाचार झाला त्याची कारणे सुद्धा यूरोपियनच आहेत. यूरोपियन देशांनी जगभर आपल्या वसाहती निर्माण केल्या व इतरांवर राज्य करणे हा आपला अधिकारच आहे या भूमिकेस नैतिक अधिष्ठान देण्यासाठी यूरोपियन विचारवंतांनी इतिहासाच्या अंतर्गत मानववंशशाखा समाविष्ट करून मानवाला आर्य, इण्डो-जर्मन, इण्डो-युरेपियन इत्यादि वंशावळींमधे विभागून टाकले. नाकाच्या लांबीनुसार मानवाचा दर्जा ठरवला आणि स्वत:साठी सर्वोच्च वंशावळ आरक्षित करून टाकली.
ही सगळी पार्श्वभूमी,
हेमंत कर्णिक यांनी भारताच्या सद्य परिस्थितीची 1933 च्या जर्मनीशी सांगड घालताना विचारात घ्यायला हवी होती. तशी ती त्यांनी विचारात घेतली नाही यामागे त्यांचे अज्ञान खचितच नसणार. कारण त्यांनी जे कोडे मांडले आहे त्यावरून त्यांचा जर्मनी संबंधी भरपूर अभ्यास असल्याचे दिसून येते. मग का बरे त्यांनी त्यांचे जर्मन कोडे भारताच्या सद्यपरिस्थितीशी जोडून सुटत असल्याचे दाखवले असेल?

याचे महत्वपूर्ण कारण ब्रिटीशांच्या भारतातील सत्तास्थापनेपासून आपण आजपर्यंत शिकत आलेल्या इतिहासात दडलेले आहे. आपण जो इतिहास शिकलो, तो भारताच्या भारतीय अवधारणेवर आधारित नसून यूरोपियन दृष्टीकोणावर आधारित आहे.
तसेच,
आतापर्यंत भारताच्या इतिहास संबंधी पुस्तकांवर कम्युनिस्ट विचारधारेचा घट्ट पगडा राहिलेला असल्याने, कम्युनिस्ट विचारधारेला विरोध करणार्‍यांना अशाप्रकारे ऐतिहासिक संदर्भांच्या गुंताड्यात गोवून फॅसिस्ट घोषित करणे सुलभ होऊन जाते. आणि अशा घोषणा करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, क्रूरकर्मा हिटलर हा प्रखरपणे कम्युनिज्म विरोधी होता. त्यामुळे, एकदा का आपल्या विरोधकांना त्याच्या रांगेत बसवले की आपण मानवतेची एक महान लढाई लढतो आहोत, असा स्वत:चाच समज करून देणे शक्य होत असावे.

सध्या ‘भारतात फॅसीझम वाढत चालला असल्याचा’ जो जोरदार प्रचार होतो आहे त्यासंदर्भात आणि कम्युनिज्म संदर्भात आपण समजावून घ्यायचे ते एवढेच की,
भारतीय उपमहाद्वीपात उदयास आलेल्या सर्वच धर्मांची भौतिकतेच्या विरुद्ध आध्यात्मिक शोध ही एकसमान मूळ धारणा राहिलेली असून, ‘कम्युनिस्ट विचारधारा’ मूळ रूपाने मानवाच्या भौतिक जगतातील सुखांसंबंधी जडवादी आहे. 

ज्या धरेवर येशू ख्रिस्ताच्या आधी सहाशे वर्षांपूर्वीचे महान दार्शनिक, ज्यांना हिंदू विष्णूचा एक अवतार मानतात त्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी, तत्कालीन निरर्थक कर्मकांडात अडकून पडलेल्या ईश्वर या शब्दाचा प्रयोग न करता सुद्धा मानवाला भौतिकतेपासून दूर ठेवत स्वत:च्या आंतरिक जगाकडे जाणाराच मार्ग दाखवलेला आहे. आणि, हा मार्ग संपूर्णपणे वैज्ञानिक असून त्याची आपण प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे अनुभूति घेऊ शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रयोगांसाठी श्रद्धा ही प्राथमिक साधन नाही.

त्यामुळे,
कोठल्याही #हिंसात्मक_क्रांती द्वारे तसेच ‘धर्म अफूसारखा असतो’ सारख्या जोरदार वाक्यासोबत ‘ईश्वराला उखाडून फेकण्याचा विचार करणार्‍या कुठल्याही तत्वज्ञानाची’ भारतीय उपमहाद्वीपात यशस्वी होण्याची शक्यता, भगवान गौतम बुद्ध यांच्याद्वारे आजपासून दोन हजार सहाशे वर्षांपूर्वीच शांततेच्या मार्गाने नाकरण्यात आली आहे.

अर्थात,
माननीय हेमंत कर्णिक हे नेमके कुठल्या विचारधारेचे आहेत हे मला माहिती नाही. परंतु, भारतातील सद्य परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी आपले ‘जर्मन कोडे’ सोडवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यावरून त्यांच्यावर यूरोपियन दृष्टीकोणावर आधारित भारतीय इतिहासाचा गाढा प्रभाव असल्याचे दिसून येते.
हरकत नाही.
आपण आपल्या स्वीकार भाव या मूळ भारतीय स्वभावाप्रमाणे आपल्या इतिहासावरचा हा यूरोपियन प्रभाव मान्य करूया आणि मग तो बाजूला सारण्यासाठी उपाययोजना करूया.

या ऐतिहासिक गदारोळात, आपल्याला फार चिंतामग्न होण्याचे निश्चितच कारण नाही.
कारण,
भारतीयांवर यूरोपियन दृष्टीकोणावर आधारित भारतीय इतिहासाचा गाढा प्रभाव लादण्याचे यथासंभव प्रयत्न आजपर्यंत केले गेले असले तरी त्याद्वारे, भारतीयांची भारतीय अवधारणा आपल्याला छिन्नभिन्न करता येईल, ही त्यासाठी प्रयास करणाऱ्या लोकांची अंधश्रध्दा असल्याचेच आतापर्यंत सिध्द झाले आहे.

असो,
#चौकट_ अंधश्रध्दा_निर्मूलनाची या मालिकेतील मागच्या #तथाकथित_बुध्दीवाद या लेखाचा समारोप करतेवेळी आपण पुढील लेखात #अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलनात वाचल्या न गेलेल्या #नयनतारा_सहगल* यांच्या भाषणाच्या अनुषंगाने,
#तथाकथित_बुद्धिवादाचे_कार्य नेमक्या कुठल्या पध्दतीने चालते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया,
असे म्हटले होते खरे.
परंतू,
मधेच उद्भवलेल्या या #जर्मन_कोड्याची_मिमांसा करण्यासाठी हा लेख लिहावा लागला त्याबद्दल मी आपणा वाचकांची व #नयनतारा_सहगल यांची माफी मागतो. त्यांच्या न झालेल्या भाषणाकडे आपण पुढील लेखात वळूया.

जाता जाता,
जर्मनीचा विषय निघाल्याने आठवले. कुरकर्मा 'हिटलर' व जगाला साम्यवादी विचारांची महान देणगी देणारे 'कार्ल मार्क्स' हे दोघेही जर्मनच होते. आणि, एकाने प्रत्यक्षपणे मानवता पायदळी तुडवली होती, तर दुसऱ्याचे आपण अनुयायी आहोत असे म्हणवून घेणाऱ्यांनीही जगाला काही शांततेच्या मार्गावर नेलेले नाही.
याउलट,
आपली भारतीय आध्यात्म परंपरा 'मानवाला मानव म्हणून विकसित करण्याचे कार्य' लाखो वर्षांपासून करत आलेली आहे. आणि, आपली हीच परंपरा आताच्या काळातही मानवी क्षोभाला निश्चितच शांत करणार आहे. फक्त आपण, आपला हा अमुल्य वारसा समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नमस्कार 🙏