Image

🦋 *बटरफ्लाय इफेक्ट* 🦋
(चौकट अंधश्रद्धा निर्मूलनाची)
----------------------------------------
by - *योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com
06 एप्रिल 2019.

एडवर्ड लॉरेन्स यांनी आपल्या चाओस थिअरीमधे मांडलेला हा *बटरफ्लाइ इफेक्ट* आपल्याला सांगतो की, कुठेतरी एका ठिकाणी झालेली शुल्लक गोष्ट, भविष्यातील एखाद्या मोठ्या घटनेस कारणीभूत ठरू शकते.

याचे उदाहरण देताना त्यांनी असे म्हटले की,
एका ठिकाणी फुलपाखराने आपले पंख फडफडवल्यामुळे तिथून हजारो मैलांवर असलेल्या दुसऱ्या एखाद्या ठिकाणी मोठे वादळ येते.

आता आपल्याला प्रश्न असा पडू शकतो की,
काहीतरीच काय बडबड लावलीये. हे असं कधी होऊ शकतं का?

पण वाचकांनो..
फुलपाखराच्या गोष्टीद्वारे दिलेले रूपक अलंकाराचे उदाहरण बाजूला ठेवले तरी... आपण मानवीय इतिहास आणि साहित्याचा अभ्यास केल्यास आपल्याला असे दिसून येईल की, होय. कधीकधी इतक्या शुल्लक गोष्टींमुळे भविष्यातील एखादी मोठी घटना घडू शकते.

असो..
माझ्याच आयुष्यातल्या एका बटरफ्लाय इफेक्ट सांगतो.

आजपासून साधारण 13 महिन्यांपूर्वी, मी एका गज़ल मुशायऱ्यात एक शेर ऐकला आणि तो ऐकून खालील लेख लिहिला होता.

---------------------------------------

*कशावर टाळ्या वाजवायच्या ?*
By,
*योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद.

(मी मुलभूत इथिक्स आणि बेसिक्सला ठेच पोहोचेपर्यंत कधीच विरोधी लिहिलं नाही.. लिहिलंच तर विरोधातूनही इतर पैलू समजावण्याचाच कल असतो..
पण,
*ही मात्र शुद्ध आणि परखड टिकाच...* )
.....
😔

मी शिव्या ऐकल्या..
मी शाप ऐकले..
मी रखरखते ताप ऐकले..
मी भगभगते संताप ऐकले..
मी धगधगते अंगारे ऐकले..
मी किंचाळ्यांतले शहारे ऐकले..
मी दु:खाचे गर्भित इशारे ऐकले...
मी युद्धाचे खुले नगाडे ऐकले..
मी नको ते हीन ऐकले..
मी कधी दर्जाहीन ऐकले..
पण,
...
मी इतके बिभत्स 👇 ... कधीच ऐकले नव्हते.

*सत्तर वर्षांचा हा माझा, देश रखेली आहे...*
*हा ही सांभाळत नाही, तो ही सांभाळत नाही...*

... कुणाविषयी बोलताय? काय बोलताय? कशासाठी बोलताय? 😡 

मातृभूमी नका मानू हवं तर..
नका मानू शिवरायांनी घडवलेल्या मातीची महती..
नका मानू संतांनी केलेला लोकजागर..
नका मानू सुधारकांनी घडवलेला समाज..
नका मानू चाफेकर बंधूचे हौतात्म्य आणि नका मानू भगतसिंगाची विचारधारा..
नका मानू गांधी, टिळक, सावरकर..
नका मानू लोकशाही, नका मानू साम्यवाद, नका मानू भांडवलशाही, नका मानू समाजवाद...
नका मानू कुठलाच धर्म आणि पंथ...

पण,
*जन्मदात्या आईची कुस तरी मानता की नाही?*

*बाळओठांनी प्राशिलेले दूध तरी मानता की नाही?*

*नऊ महिण्यांचा गर्भ आणि तुटण्याआधीची नाळ तरी मानता कि नाही?*

स्वप्रतिमा पुजण्याची सवय लागलेल्या समाजाचं, हेच का खरं बुरखा फाडून बाहेर पडलेलं ओंगळ रूप?

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...* लिहून, मातृभाषेची अभिजात सेवा करणाऱ्या, सुरेश भटांनी जगद्विख्यात केलेल्या, "मराठी भाषेतील गझलेच्या शेरांची" हीच आजची घाणेरडी पातळी?

नाही कळत मतला, नाही कळत काफिया.. तरीही गझल कळते आम्हाला...
नाही कळत मात्रा, नाहीत कळत वृत्त.. तरीही गझल पचते आम्हाला..
गझल गायला गळ्याला तान नसली तरी, गझल ऐकायचा विशिष्ट कान आहे आम्हाला..

हा कान आहे म्हणूनच महान नटसम्राटासारखं म्हणावसं वाटतंय, *हे ऐकण्याआधीच कान फुटले का नाहीत आमचे?*

जगातल्या सर्व धर्म-पंथांना आपल्या कवेत सामावून घेणाऱ्या "जम्बुद्वीपीय मातीबद्दल" ही असली शब्दरचना?
का?
तुम्हाला 'क ला ख' आणि 'त ला प' जोडता येतं म्हणून?

कुणाची लायकी आहे हा देश सांभाळण्याची?
कोण या "भारतीय उपखंडापेक्षा मोठा होऊन" त्याला सांभाळण्याची भाषा करू शकतो?

अरे,
अखंड भारताचे तुकडे करून आपला वाटाहिस्सा घेऊन गेलेले सुद्धा या भुमीला हिंदू-मुस्लीम हे दोन सुंदर नयन असलेली नववधू मानत होते रे...

...
गदगदून टाकणाऱ्या दु:खाचा हा शेवट गझल शिकणारांसाठी....

... "अकारण दंभी व अर्धवट ज्ञान असलेला गुरू, आपल्या शिष्यांनाही शेवटी नरकाच्या द्वाराकडेच घेऊन जातो.." असं "भारतीय (या उपखंडात उदयास आलेल्या सर्व धर्मांची) आध्यात्म परंपरा" मानते.

*कुणासाठी काहिही असो..*
*हा देश तुमच्या आमच्यासारख्या करोडो करोडो भारतीयांसाठी मातृभुमी होती.. मातृभुमी आहे.. आणि मातृभुमीच राहील.*

*आणि, तिला हिनवणाऱ्यांच्या सुमार बुद्धीमत्तेसाठी...*

(या वयातही नाती, सांभाळण्याचा योग येतो..
मुलींसोबत बाहुल्या, खेळण्याचा योग येतो..
रे नका कर्मदरिद्र्यांनो, गर्भात कळी खुडू ,)
*'योगी' देतसे शाप मग, आत्म्यास रोग येतो...*

... *असेच कठोर शब्द उमटतील.*
---------------------------------------
👆
हा असतो *बटरफ्लाय इफेक्ट...*

एका गज़लेच्या शेराने,
लहान मुलांसाठी *अद्भुत कथामालिका* लिहिणाऱ्या माझ्यासारख्या एका छोट्याशा लेखकाला आतून इतकं हलवून टाकलं की मला,
एका मोठ्या परिदृश्यातून आजकाल लिहिल्या जात असलेल्या एकंदरीत भारतीय साहित्याचा विचार करावा लागला.
भारतीय साहित्यावर ज्या विघातक वृत्ती काही शतकांपासून प्रभाव पाडत आहेत... त्या वृत्तींचा आणि त्यांनी घडवून आणलेल्या परिणामांचा विचार करावा लागला..
हा परिणाम नेस्तनाबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार करावा लागला..

हरकत नाही...

आनंदाची गोष्ट अशी की,
13 महिन्यांपूर्वी त्रास देणाऱ्या *बटरफ्लाय इफेक्ट* मुळे घडून आलेल्या मोठ्या बदलाचे सकारात्मक परिणाम, आज *अंधारातून प्रकाशाकडे* घेऊन जाणाऱ्या शाश्वत मार्गावर घेऊन आले आहेत.

हा मार्ग..
इंग्रजी शिक्षण भारतात आल्यापासून भारतीय जनमनावर हळूहळू आपला घट्ट पगडा निर्माण करणाऱ्या, *सगळंच नाकारण्याची वृत्ती* घडवू पाहणाऱ्या *तथाकथित बुद्धिवादी* जंजाळातून, पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मूळ स्वभावाकडे... आपल्या मूळ भारतीय स्वभावाकडे... आपल्या मूळ भारतीय उपखंडाच्या स्वभावाकडे... आपल्या मूळ जंबूद्विपिय स्वभावाकडे... *स्वीकार भाव..* या आपल्या मुलभूत स्वभावाकडे घेऊन जाणारा आहे..

असो..
---------
जाता जाता...

आत्ताच सहाशे कलाकारांनी मोदींच्या म्हणजेच भा.ज.पा. च्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केल्याची बातमी वाचली.

*सगळंच नाकारण्याची वृत्ती* एकदा अंगी भिनली, की मग त्याचे परिणाम असे होत जातात.
आपल्या विचारधारेच्या विरुद्ध मतप्रवाह असलेले लोक 05 वर्षांपुर्वी सत्तेत काय आले,
या *तथाकथित बुद्धिवाद्यांनी* 70 वर्षांची भारतीय लोकशाहीची परंपरा क्षणार्धात विसरून, भारतात हुकूमशाही येत असल्याची *अवास्तव हाकाटी* पसरवायला सुरुवात केली.
*भाषण स्वातंत्र्याची गळचेपी* होत असल्याचा आरडाओरडा करत हे लोक 05 वर्षांपासून, मिळेल त्या ठिकाणी.. मिळेल त्या वेळी.. मिळेल तेवढे.. आणि वाटेल तसे.. बोलतच आले आहेत.

इतके बोलूनही,
"आपल्या बोलण्याचा परिणाम शून्य होतोय की काय?" असे वाटल्याने या लोकांनी आता सरळ सरळ *राजकीय आखाड्यात* उडी घेतली आहे.
अर्थात,
त्यास आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही.

*आक्षेप आहे, तो या लोकांनी जगभरात भारताला बदनाम करण्याच्या चालवलेल्या कटकारस्थानांवर.*

हे सगळे लोक,
त्या नसरुद्दीन शहाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत, ज्याला आपल्या मुलांच्या भारतातील सुरक्षेबद्दल भीती वाटू लागली आहे..
त्या अमीर खानच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत, ज्याच्या बायकोला काही वर्षांपूर्वी भारतात असुरक्षित वाटायला लागलं होतं..
त्या भारताच्या उपराष्ट्रपती हमीद अन्सारीच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत, ज्याने पदावरून पायउतार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी "भारत मुस्लिमांसाठी असुरक्षित झाल्याची" दवंडी पिटली होती..

अरे उतरा ना रिंगणात.. नको कोण म्हणतंय?

भारतीय लोकशाहीवर तुमची श्रद्धा आहे की नाही?
कि 05 वर्षांपूर्वीपर्यंत भारतात सगळं काही ठीक चाललं होतं, ही सुद्धा तुमची *अंधश्रद्धाच* म्हणायची?

ठेवा जरा भारतीय नागरिकांवर विश्वास आणि होऊन जाऊ द्या *लोकशाहीचा महोत्सव.*

पण त्यासाठी जगभरात भारताला बदनाम कशाला करताय?

आणि हो..

भारत कधीच कुणासाठी असुरक्षित होत नाही.
तसेच भारताच्या सुपुत्रांना *असुरक्षिततेच्या भयाचा न्यूनगंड* कधीच पछाडत नाही.

जरा व्यवस्था परिवर्तन काय झाले.. तुमच्या बुडाखालच्या खुर्च्या काय गेल्या.. तुम्ही भारतालाच बदनाम करायला सुरुवात केलीत...

*तुम्ही भयग्रस्त झाला असाल,*
*पण जसे हजारभर वर्षांच्या परकीय आक्रमणांच्या काळात आमचे पूर्वज उभे होते.. तसेच आम्ही अजूनही निधड्या छातीने उभे आहोत.. नुसतेच एकटे नाही तर आमच्या मुलाबाळांसकट उभे आहोत..*

पारशी, बहाई, ज्यू , तिबेटीयन बौध्दांप्रमाणे जगभरातून नाकारल्या गेलेल्यांच्या प्रेमळ *स्वागतासाठी..* त्यांच्या *संरक्षणासाठी..*

आमच्या अस्तित्वाची *गुढी* असलेली ही *केशरी विजय पताका* घेऊन...

नमस्कार 🙏

☘ 🍁 ☘ 🍁 ☘