पतंगास पत्र

काल्पनिक पत्रलेखन

पतंगास पत्र


प्रेषक
नंदू पतंगवाले
कागदी गल्ली
फिरकीपुर
12345678
दि 14/01/2019


प्रिय पतंगा,
गोड गोड पापा.
आज आकाशात तुला उंच उडताना पाहिले अन लगेचच पत्र लिहायला घेतले.
मला तू फार आवडतोस. पंख नसूनही तू आभाळात मजेत उडत असतोस.तुझे वेगवेगळे रंग आणि मजेमजेचे आकार मला नेहमीच हवेसे वाटतात. तुझी लांबलचक नागासारखी शेपटी सारखी वळवळत असते.
एकदा मी बाबांकडे पतंगासाठी हट्ट केला होता .तेव्हा बाबांनी मला घरच्या घरी पतंग बनवून दिला होता.कागदापासून पतंग कसा बनवायचा
हे मी बाबांकडूनच शिकलो .आता मलाही नाना रंगांचे आणि ढंगाचे पतंग बनवता येतात . माझ्या मित्रांचा वाढदिवस असला की मी त्यांना त्यांच्या आवडीचा पतंग बनवून देतो . खूप खुश होतात ते.
बरं मला एक सांग की उंच उडताना तुला भीती तर वाटत नाही ना!!! आणि हो...... वर गेल्यावर तुला ढग, पक्षी , विमान या साऱ्यांना अगदी जवळून बघता येत असेल , स्पर्श करता असेल ना !! मज्जा आहे बुआ तुझी. ए....... मलाही कधीतरी तुझ्यासोबत ने ना रे आभाळात . मलाही वरुन खाली बघायचे आहे .उंचावरून माझे जमिनीवरचे मित्र कसे दिसत असतील ते मला एकदा बघायचे आहे .
तुझ्या मांज्याची मात्र मला जाम भीती वाटते . एकदा तर माझा हातच कापला होता . तेव्हापासून जरा कमीच पतंग उडवितो मी.
आता  मी जातो . चंदूला पतंग बनवून द्यायचा आहे . तो साहित्य घेऊन आलाय . टाटा.
तुझाच मित्र
नंदू

प्रति ,
पतंगराव शेपटीवाले
आकाश विहार
उंचवाडी

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.