निर्णय क्षमता

निर्णय क्षमता किती महत्त्वाची आणि अचूक असणे, हे किती गरजेचे आहे, याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येत असतो.
निता ला  आवड होती संगीताची. पण दहावीनंतर तिने शास्त्र ही शाखा निवडली. पण ते जमले नाही म्हणून डिप्रेशनमध्ये गेली. हा निर्णय तिने कदाचित आई-वडिलांच्या दबावाखाली खाली घेतला असावा किंवा त्या वयात तिला तो निर्णय घेता आला नसावा. पण कशामुळे हे यावेळी गौणच ठरते, पण निर्णय चुकला हे नक्की. त्या निर्णयाचे परिणाम तिला व कुटुंबाला भोगावे लागले.
कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या काही निर्णयांना अनेक जण जबाबदार असतात. पण तो घेताना अनेक बाबींचा विचार करून, शेवटी ज्यांचा निर्णय त्यांनीच घेतला पाहिजे.
लग्नाच्या बाबतीत तर ही निर्णय प्रक्रिया खूपच नाजूक असते. यामध्ये मुलगा, मुलगी त्यांचे आणि आई, वडील, आजी-आजोबा इतर नातेवाईक अनेक जण सहभागी असतात.व ते त्या प्रक्रियेत भाग पण घेतात. पूर्वी या निर्णयात मुलगा व मुलगी फारसे नसायचे, पण आता तेच निर्णय घेतात. हेच योग्य असते. पण असे असून सुद्धा तो चुकू शकतो .
निर्णय जरी आज घेतला तरी, त्याचे परिणाम नंतरच दिसतात.
एका निर्णयावर अनेक जणांचे जीवन अवलंबून असते. बरेचदा निर्णय प्रक्रिया बरीच क्लिष्ट असते .पण आपली सद्सदविवेक  बुद्धी जागी असेल व आपला आतला आवाज ऐकता आला तर ती सहज होऊ शकते.
एकदा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. तो निर्णय जर स्वतःचा असेल तर त्याचे चांगले व वाईट परिणाम भोगण्याची तयारी हवी व वेळेवर त्यात योग्य ते बदल करून त्याला स्वीकार करायला हवे.
काही वेळेला सुरुवातीला अयोग्य वाटणारे निर्णय नंतर योग्य वाटतात व आपला जीव भांड्यात पडतो.
काही व्यक्ती स्वतःच्या निर्णयाबाबत पक्या असतात. व त्याचे परिणाम भोगायला मागे पुढे बघत नाही. काही व्यक्ती मनाने खूप भावनाप्रधान असतात व त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते व परिणाम भोगण्याची पण क्षमता नसते. या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेल्या असतात.
एकंदर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी, सद्सदविवेकबुद्धी, कुटुंबातील इतर घटक या अनेक गोष्टींवर आपली निर्णय घेण्याची क्षमता अवलंबून असते.
काही निर्णयांना कुटुंबातील सगळे जण एकत्र बसून,विचार करून घेण्याची गरज असते. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी नीट विचार विनिमय करून निर्णय घ्यावा व त्याची नीट अंमलबजावणी होईल पर्यंत त्याकडे लक्ष ठेवावे. यामुळे नंतर पश्चाताप करायची गरज पडत नाही.
निर्णय घेतल्यावर त्याचे परिणाम चांगले झाल्याने बरेचदा आपला
विश्वास वाढतो. त्यामुळे पुढचे निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
एका व्यक्तीने घेतलेल्या निर्णयामध्ये दुसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप करायला नको वा त्यावर अनेक प्रकारची टिप्पणी करण्याने त्या व्यक्तीचा विश्वास कमी होतो व पुढच्या  वेळी निर्णय घेताना मानसिक तयारी होत नाही, हा विचार सगळ्यांनी जरूर करायला हवा.
लहान मुलांना सुद्धा कुटुंबामध्ये छोट्या निर्णयामध्ये सहभागी करून घेतल्याने ,त्यांची निर्णय क्षमता वाढते व पुढे जाऊन विश्वासाने ते निर्णय घेऊ शकतात.
निर्णय म्हणजे निर्वाणी ची भाषा नाही. त्यात आपल्याला इतरांच्या सहभागाने बदल करून घेता येतात.
कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती आल्यावर त्या व्यक्तीला सुरुवातीपासूनच घरातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्या व्यक्तीला आपले पणा वाटू लागतो. जसे की घरात नवीन सून आली की, तिला विचारून काही निर्णय घेतल्याने , तिचा कुटुंबातल्या सदस्यांवरचा विश्वास वाढू शकतो.
देश पातळीवरची निर्णय प्रक्रिया किती किचकट असू शकते याची आपल्याला कल्पना आहे. त्याकरता देशाचा सर्वोच्च नेता सुयोग्य हवा की त्याने देशात करता घेतलेले निर्णय अनुकूल हवेत. योग्य निर्णय न घेतल्याने अनेक देशांमध्ये लढाया झालेल्या आपण नेहमीच बघतो. त्याने संपूर्ण जगावर वाईट परिणाम होतात.
एकत्र व योग्य निर्णय घेण्याने नवरा बायकोचे संबंध अतिशय चांगले राहू शकतात. त्याने कुटुंबाचे मानसिक आरोग्य सुद्धा सुदृढ होते.
म्हणूनच निर्णय घेणे ही एक व्यापक प्रक्रिया आहे ती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
-----वैशाली देव

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.