स्थान महात्म्य

बाजारात जाण्यासाठी मी दुपारी लवकरच बाहेर पडते.रिक्षा, बसेस, दुचाकी यांची गर्दी नसते.आरामात चालत जाता येते, आजूबाजूचे निरीक्षण करत.

पुस्तकांचे दुकान बंद होऊन त्या जागी मोबाईलचे दुकान उघडले आहे,भेळपुरीचा स्टॉल बंद होऊन त्या जागी पिझ्झा बर्गर आणि मोमोजचं पिकप कॉर्नर उघडलंय, किराणा मालाचं दुकान बंद होऊन त्या जागी कपड्यांचे दुकान सुरू झाले आहे वगैरे...

मी आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करीत चालले होते.समोरुन एक तरुण येत होता.जीन्सची पॅन्ट,टी शर्ट, स्पोर्ट्स शूज आणि डोक्यावर कॅप.जवळ आल्यावर माझ्याकडे पाहून ओळखीचं हसला.मी बुचकळ्यात पडले.चेहरा तर अगदी परिचित वाटत होता पण कोण ते काही लक्षात येईना.बरं तर बरं तोंडावर मास्क होता त्यामुळे नुसती डोळ्यांची उघडझाप करून वेळ मारुन नेली, पण डोक्यातील भुंगा काही जाईना.कोण बरं होता तो तरुण?इतका रोजच्या बघण्यातला होता तरी कसा काय ओळखू आला नाही? घरी आले तरी तो तरुण मुलगा कोण होता हा विचार काही पाठ सोडेना.

दुसऱ्या दिवशी इस्त्रीच्या दुकानासमोरुन जातांना हाक आली,'आंटी, इस्त्री का कपडा तैय्यार है,घर जाते वक्त ले के जाना', मी' हां'म्हणत मान डोलावली आणि भैय्याकडे पाहिले.डोक्यात शंभर वॅटचा बल्ब पेटला.कालपासून ज्या विचाराने माझे डोके कुरतडले होते त्याचे उत्तर मला अचानक सापडलं होतं.

काल भेटलेला तो तरुण मुलगा म्हणजे आमचा इस्त्री वाला भैय्या होता!

मग मी त्याला ओळखू का बरं शकले नाही?कारण मी त्याला रोज कळकट बनियन आणि बर्म्युडा मध्ये पहात होते.दुकानाच्या काउंटरवर.इस्त्री करतांना, कपडे मोजून पैशांचा हिशेब करतांना.आणि काल पाहिला तो वेगळ्याच कपड्यात, वेगळ्या जागी.म्हणजे मी त्याला ओळखू शकले नाही कारण माझ्या मनात त्याची जी प्रतिमा होती त्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात तो सामोरा आला होता म्हणून!

बघा हं, आपल्या फॅमिली डॉक्टर साडी नेसून, हातात ओटीचे साहित्य घेऊन जर देवळात रांगेत उभ्या राहिल्या तर आपल्याला गोंधळायला होईल ना?

किंवा एखादी रोज साडी नेसणारी आपली नेहमीची भाजीवाली जर पंजाबी ड्रेस मध्ये थिएटरच्या आवारात आपल्याकडे पाहून ओळखीचे हसली तर आपण गडबडून जाऊ ना!

म्हणजे आपल्या मनात व्यक्तीची ओळख त्यांची नेहमीची जागा,त्यांचा पोशाख यांच्याशी निगडीत असते.चेहऱ्यापेक्षाही!

माझं म्हणणं तुम्हाला पटतंय ना!


  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.