पसारा

एक दिवस घर आवरले नाही  तर इतका पसारा होतो ,तो पाहून डोक्यात एक विचार आला की मनात साचलेल्या विषय वासनांचा पसारा आपण खरंच आवरतो  का? त्यांना लगाम घालणे  खूप गरजेचे आहे. द्वेष, ईर्षा ,मत्सर ,घृणा, चढाओढ, हाव अशा अनेक वासनांना आपण दररोज बळी पडत असतो. आपल्या भौतिक मनात असेच अनेक विचार घर करून बसलेले असतात. पण आपण त्यांना त्याच वेळी आवर घालतो का? तर त्याचे उत्तर आहे नाही. मग "वाढता वाढता वाढे "या उक्तीप्रमाणे ते नेहमी करता आपल्या मनात घर करतात व वेळ आली तेव्हा डोके बाहेर काढतात. त्यांचा पसारा किती आतपर्यंत पसरला असेल याची कल्पना न केलेलीच बरी .आपले सुप्त मन आपल्याला वारंवार सूचना देत असते की आवर हा विषय वासनांचा पसारा, पण भौतिक मन मात्र स्वीकारायला तयार नसते. त्याच्याकडे समर्थनार्थ दहा कारणे असतात .समर्थांनी म्हटलेच आहे की 'अचपळ मन माझे नावरे आवरीता '.या मनाचा पसारा इतका अफाट आहे की त्याला आवरायला एक जन्मही पुरेसा नाही. हा पसारा घेऊनच आपण पुढच्या जन्माची वाटचाल करतो .म्हणून योग्य वेळीच त्या विषय वासनांचा वारू तिथेच थांबायला हवा .जेणेकरून घराचा पसारा व मनातील पसारा पण आवरला जाईल ,व बाह्य आणि आंतरिक शांतता आपल्याला अनुभवता येईल.

----वैशाली देव

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.