नाटो

रशिया युक्रेन युद्ध सुरू होण्यामागील अत्यंत महत्वाचे एक कारण आहे ते म्हणजे नाटो. नाटो म्हणजे नक्की काय आणि त्याचा या सुरू असलेल्या युद्धात नक्की संबंध काय आणि या युद्धाचा परिणाम आज आपल्या भारतातील युक्रेन मध्ये शिकणारा विद्यार्थ्यांवर कसा होत आहे आणि भविष्यात कसा होईल या वर भाष्य करणारा हा आजचा लेख.

1) नाटो :-नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ज्याला नॉर्थ अटलांटिक अलायन्स देखील म्हणतात.नाटोची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्ट्रांनी केली. नाटोचे मुख्यालय  बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे.नाटोचे अलायड कमांड ऑपरेशन्सचे मुख्यालय मॉन्सजवळ आहे.नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग हे आहेत.

2)नाटो स्थापनेचे कारण :- दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांनाही संपुर्ण जगावर आपला अधिकार गाजवायचा होता. जगावर वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा या दोघांमध्ये सुरू झाली होती आणि याचा परिणाम म्हणून अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील संबंध बिघडू लागले आणि त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट सरकारला युरोपीय देशांवर आपले वर्चस्व गाजवायचे होते.टर्की आणि ग्रीसवर नियंत्रण ठेवून काळ्या समुद्रातून होणारा जागतिक व्यापार नियंत्रित करायचा होता आणि झाले. सोव्हिएत युनियनच्या अशा या धोरणांमुळे युरोपमधील सोव्हिएत युनियनचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देश यांनी मिळुन नाटोची स्थापना केली.कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला येतील, या मुद्द्यावर सदस्य देशांमध्ये सहमती झाली होती.

3) नाटोला रोखण्यासाठी सोव्हिएत युनियनचा करार:-नाटोशी व्यवहारकरण्याच्या उद्देशाने सोव्हिएत युनियनने वॉर्सा कराराची स्थापना केली. १४ मे १९५५ रोजी. या कराराची स्थापना झाली. हा करार सोव्हिएत युनियन, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड,चेकोस्लोव्हाकिया,रोमानिया,अल्बेनिया,बल्गेरिया या देशांमध्ये झाला. हा करार १ जुलै १९९१ रोजी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर संपला.

4) नाटो सदस्य देश:-

 1आल्बेनिया
 2बेल्जियम
 3बल्गेरिया
 4कॅनडा
 5क्रोएशिया
 6चेक प्रजासत्ताक
 7डेन्मार्क
 8एस्टोनिया
 9फ्रान्स
 10जर्मनी
 11ग्रीस
 12हंगेरी
 13आइसलॅंड
 14इटली
 15लात्व्हिया
 16लिथुएनिया
 17लक्झेंबर्ग
 18मोंटेनेग्रो
 19नेदरलँड्स
 20नॉर्वे
 21पोलंड
 22पोर्तुगाल
 23रोमेनिया
 24स्लोव्हाकिया
 25स्लोव्हेनिया
 26स्पेन
 27तुर्कस्तान
 28युनायटेड किंग्डम
 29अमेरिकेची संयुक्त संस्थाने

5) नाटोच्या प्रमुख कारवाया कोणत्या :-१९९० नंतर, नाटोने जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक कारवाया केल्या. 1)ऑपरेशन अँकर गार्ड (१९९०) :-इराक-कुवैत युद्धामध्ये ऑपरेशन अँकर गार्डच्या माध्यमातून तुर्कीला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी नाटोची लढाऊ विमाने तेथे तैनात करण्यात आली होती.

2) ऑपरेशन जॉइंट गार्ड (१९९३-१९९६) :-बोस्निया आणि हर्झेगोविना युद्धात १९९४ मध्ये, नाटोने चार बोस्नियाई सर्ब युद्ध विमाने पाडली. नाटोची ही पहिली लष्करी कारवाई होती. १९९५ मध्ये, नाटोने दोन आठवड्यांच्या बॉम्बफेकीने युगोस्लाव्हियन युद्ध संपवले.

3) ऑपरेशन अलायड फोर्स (१९९९) :- कोसोवोमध्ये अल्बेनियन वंशाच्या लोकांवर अत्याचार केल्यानंतर, नाटोने मार्च १९९९ मध्ये युगोस्लाव्हियन सैन्यावर कारवाई सुरू केली.

6) रशिया-युक्रेन वादाचे कारण :- २००४ मध्ये, नाटोमध्ये तीन देश सामील झाले जे सोव्हिएत युनियनचा भाग होते. लाटविया, एस्टोनिया आणि लिथुआनिया, हे तिन्ही देश रशियाच्या सीमेवर आहेत.

युक्रेन हा पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग होता. त्याची सीमारेषा ही रशिया आणि युरोपियन युनियनला लागून आहे. युक्रेन हा नाटोचा ‘भागीदार देश’ आहे याचाच अर्थ भविष्यात कधीतरी युक्रेनला नाटोचा सदस्य होता येऊ शकतं आणि यामुळेच युक्रेन गेल्या अनेक वर्षांपासून नाटोमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहे.

युक्रेनची रशियाशी २२०० किमी पेक्षा जास्त सीमा आहे. त्यामुळे युक्रेन जर नाटोमध्ये सामील झाला तर युक्रेनच्या बहाण्याने नाटोचे सैन्य रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल, असे रशियाला वाटते. आणि युक्रेन जर नाटोमध्ये सामील झाला पाश्चात्य देशांपासून मॉस्कोच्या राजधानीचे अंतर केवळ ६४० किमी होईल सध्या हे अंतर सुमारे १६०० किलोमीटर आहे.रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचा आरोप आहे की, पाश्चिमात्य देश हे रशियाला घेरण्याच्या उद्देशाने या देशांशी संबंध जोडत आहेत.नाटो पूर्वेकडे विस्तार करणार नाही, हे 1990 मध्ये दिलेलं आश्वासन अमेरिकेनं मोडलं असल्याचा दावाही पुतिन यांनी मागे केला होता.

त्यामुळे या संघर्षाचं मुख्य कारण आहे युक्रेनची नाटोमध्ये जाण्याची इच्छा.

युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी :- युक्रेन हा देश नेहमीच उच्च शिक्षणासाठी जगभरातील अनेक देशांच्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती राहिला आहे.युक्रेनियन विद्यापीठांमध्ये आता 76 हजाराहून अधिक परदेशी विद्यार्थी शिकत आहेत, जे 154 देशांमधून आले आहेत. भारतातूनही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जातात. युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा टेस्ट द्यावी लागत नाही. कमी फी असल्यामुळे भारतातील विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यास पसंती देतात.कमी प्रवेश फी, राहण्या खाण्याचा खर्चही  कमी आणि महत्वाचं म्हणजे कमी स्पर्धा. यामुळेच भारतातील विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जातात. तिथे कोणत्याही प्रकारचे आंतरजातीय संघर्ष नाहीत, आरक्षण नावाचा प्रकार नाही आणि मग यामुळेच आपल्याकडील विद्यार्थी तिथे शिकण्यास जातात.

परंतु आज या युद्धाच्या परिस्थितीमुळे या घडीला युक्रेन मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजुन युद्ध सुरूच आहे हे किती वेळ सुरू राहणार याचा अंदाजही नाही. युद्ध थांबल्यानंतरही तेथील परिस्थिती पुर्ववत होण्यास अनेक वर्षे लागणार. एकुणच काय तर या विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य काय यावर आता आपल्या शासनाने विचार करायला हवा.

नुसतेच आम्ही मुलांना सुखरूप आणले म्हणून चालणार नाही, ते तर तुमचे कर्तव्य आहे. परंतु आज सरकारने खर्या अर्थाने विचार करायची वेळ आली आहे की आपल्याकडील विद्यार्थी परदेशी जाऊन शिकण्यास इतके महत्त्व का देत आहे. याला कारण आहे आपली शिक्षण पद्धती, आपल्याकडे चालणारा आरक्षणासारखा घातक प्रकार, सतत वाढती फि, लाच देऊन प्रवेश यामुळे हुशार विद्यार्थी वर्गाचे नुकसान होते आणि मग ते परदेशी शिक्षणाचा मार्ग अवलंबतात. आज दोन भारतीय विद्यार्थी याला बळी पडले याला जिम्मेदार कोण? सरकार घेणार का जिम्मेदारी, नाही घेणार. मग तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल तर यावर मार्ग काढा. आता या मायदेशी परतलेल्या मुलांच्या पुढील भविष्यासाठी, शिक्षणासाठी त्यांना मदत करा. आणि मग छाती ठोकपणे सांगा की आम्ही या मुलांना फक्त मायदेशी सुखरूप आणलेच नाही तर त्यांचे भविष्यही घडवण्यास सहाय्य केले.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.