Image

विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची आवड आणि अन्यायाविरुद्ध चीड असलेले गणपतराव अमृतकर यांनी आदिवासी, पीडित, कष्टकरी समाजासाठी मोठा लढा उभारला. काँग्रेस सेवादलाचे ते कार्यकर्ते होते. परंतु, ते तिथे रमले नाहीत. त्यांनी डावी विचारसरणी अंगिकारली आणि डाव्या पक्षांनी छेडलेल्या आंदोलनात ते आयुष्यभर सोबत राहिले. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून कन्या अनिता यांनी त्यांच्या जीवनचरित्र्यावर आधारित कॉम्रेड : एक निस्वार्थी समाजसेवक या पुस्तकाचे प्रकाशन व अभीष्ठचिंतन सोहळा बुधवार, दि. २0 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित केला होता. मात्र, काळाची पाऊले काही वेगळेच संकेत देत होती. सायंकाळच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सकाळीच भेट देऊन शुभेच्छाही दिल्या. गणपतराव येत्या १ एप्रिल रोजी वयाच्या ९0 व्या वर्षात पदार्पण करणार होते. परंतु कन्येने आयोजित केलेल्या अभिष्ठचिंतन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशीच दुपारी २ वाजता समाधी वॉर्ड, चंद्रपूर येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मावळली. एका आनंदाच्या सोहळ्याप्रसंगी दु:खाच्या अर्शूंनी हजेरी लावली.

  •  देवनाथ गंडाटे

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गणपतराव अमृतकर यांचा जन्म कोतवाली वार्ड, चंद्रपूर येथे १ एप्रिल १९३१ रोजी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव जनाबाई होते. त्यांना महादेवराव, नामदेवराव व बहीण वच्छला ही भावंड होती. त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूर येथे झाले. वडील गोविंदराव अमृतकर यांच्या शेती व्यवसायात त्यांनी हातभार लावला. १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा आलापल्ली, भामरागड , गडचिरोली, वडसा नक्षलवादी क्षेत्रात आदिवासीच्या समस्या समजून घेण्यासाठी सायकल तथा मोटरसायकलने त्यांनी प्रवास केला. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. जनजागृती निर्माण केली. प्रशासनातील भ्रष्टाचारावर त्यांनी वचक बसविला. सफाई कामगारांना न्याय मिळवून दिला. भाई ए. बी. बर्धन यांचे ते स्नेही होते. १९७८ साली भाई बर्धन विधानसभा निवडणुकीत गणपतरांच्या प्रचारार्थ गांधी चौकात भाषण केले. मागील काही वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार झाला.
चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा जंगलाने व्याप्त असल्याने भूमिहीन शेतकर्‍यांनी जबरान जोत जमिनी वाटल्या. त्या जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून आंदोलने केली. पोलिसांनी गुन्हे दाखल केले अनेकदा तुरुंगातही जावे लागले. झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना घरासाठी पट्टे मिळावे , यासाठी आंदोलने केली. दुगार्पूर औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून सतत लढा दिला आणि यामुळेच या शेतकर्‍यांना दोन वेळा वाढीव रक्कम मिळाली. १९७४ मध्ये त्यांच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप होता. या आरोपातून त्यांची निदोष सुटका झाली. उरण येथील एक प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या. पण त्या जमिनीचा योग्य मोबदला दिल्या गेला नाही. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झाले. चंद्रपूर जिल्ह्यातही आंदोलन झाले. या आंदोलनात त्यांच्यासह अनेकांना चंद्रपूरच्या तुरुंगात डांबण्यात आले. गोवामुक्ती लढय़ात बाबुराव थोरात शहीद झाले. ते गणपतरावांचे मित्र होते. थोरात यांच्या स्मृतिनिमित्त आझाद बागेत स्मृती स्मारक उभारण्यात आले. गोवा मुक्ती संग्रामात बाबुराव थोरात मृत्यू पावल्यामुळे त्यांचे कुटुंब पोरके झाले. त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चंद्रपूर हॉस्पिटलच्या बाजूला त्यांच्या निवासस्थानासाठी जागा मिळवून दिली. त्यांचा गृहकर रद्द व्हावा, यासाठीही पुढाकार घेतला होता.
चंद्रपूर नगरपरिषदेत ते सदस्य होते. याकाळातही अनेक सामाजिक आणि आंदोलने केली. त्यांची पत्नी ताराबाई अमृतकर यांचे मागील २0१३ रोजी निधन झाले. मुलगा गोपाळ हे देखील तत्कालीन नगर परिषदेत नगरसेवक होते. सून संगीता अमृतकर या काँग्रेसच्या तिकिटावर चंद्रपूरच्या पहिल्या महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, शेतमजूर कामगार, वनमजूर व सफाई कामगार यांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी लढा दिला.

९६0७0७0८0१