*भारतासमोरील वर्तमानाचे सर्वात मोठे आव्हान* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------
by - *योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com
23 जानेवारी 2019
काल ‘हळदी कुंकवा’ संदर्भात व्हाट्सअपवर ‘अकलेची हळद, अन परंपरेचं कुंकू..’ नामक एक पोस्ट वाचली आणि जेष्ठ मराठी लेखक ‘श्री. भालचंद्र नेमाडे’ यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकातील *‘कुणी हीनवणारं नसतं, तोपर्यंत कुणी हीन नसतं’* या वाक्याची प्रचिती आली. सदरील पोस्ट बुद्धीवाद्याच्या थाटात अशी लिहिली आहे की, कुणालाही सहज वाटावं की, अरे, खरंच तर आहे. आपल्या हिंदू महिला कसल्या भंपक प्रथा परंपरा पाळत आहेत? किती हे मागासलेपण?
असो.
आपला विषय तो नाही. ‘चौकट – अंधश्रद्धा निर्मूलनाची’ या लेखमालेतील याआधीच्या ‘नाण्याची एक बाजू’ या लेखाचा समारोप करतेवेळी म्हटल्याप्रमाणे, आता आपल्याला विचार करावयाचा आहे तो *'भारतासमोरील वर्तमानाच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा* आणि हे आव्हान आहे *‘आपला सर्वसमावेशक स्वभाव’* टिकवून ठेवण्याचं.
स्वत:च्या मस्तकात, शिगोशीग *‘नकारात्मकता’* भरून पृथ्वीभर वावरणार्या लांडग्यांच्या हपापलेल्या डोळ्यांमधून, रक्ताळलेल्या जबड्यांमधून, विसविशीत लाळ टपटपणार्या जिभांच्या तावडीमधून आपल्याला *‘सकारात्मकता’ टिकवून ठेवता येईल का?* हा खरा आजच्या काळाचा प्रश्न आहे. आणि, हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी *‘स्वीकार भाव’* हे जन्मजात वैशिष्ट्य असणार्या जंबूमहाद्वीपाच्या रहिवाशांना, म्हणजे आपण भारतीयांनाच आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल.
*का? का ही जबाबदारी आपणच उचलायची?*
*कारण, ‘धर्म म्हणजे कर्तव्य’ या जंबुद्विपिय व्याख्येनुसार ते आपले कर्तव्य आहे. तो आपला स्वभाव आहे. आपल्याला ‘स्वीकारणे’ माहिती आहे ‘नाकारणे’ नव्हे.* आपल्या पूर्वजांनीही याच धर्माचे पालन केलेले आहे आणि म्हणूनच या ‘भारतभूमीत’, या आपल्या भारतभूमीत, या आपल्या मातृभूमीत उदयास आलेले हिंदू, बौद्ध, जैन, सिख यांसाररखे अनेक धर्म आणि नानाविध पंथ हजारो वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेम, आदर व नम्रतेने रहात आलेले आहेत. त्याचबरोबर, जगभरात ठिकठिकाणी बहिष्कृत केल्या गेलेल्या पारसी, इराणी (झरथृष्टाला मानणारे), बहाई, ज्यू यांसारख्या विभिन्न धर्मांच्या पालनकर्त्यांनी भारतीय उपखंडात आश्रय घेतलेला आहे आणि आपण भारतीयांनी त्यांना मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलेले आहे. आपापल्या प्रथा-परंपरा निर्भयपणे जपण्याचे त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे.
मानवीय अस्तित्वाचा लाखो वर्षांचा जंबुद्वीपिय इतिहास साक्ष देतोय की, इथे उदयास आलेल्या धर्म-पंथांच्या पालनकर्त्यांनी, सिंधुच्या या बाजूला राहू इच्छिणार्यांना कधीही इथून ‘जा’ असे म्हटलेले नाही किंवा इथून जबरदस्तीने हाकलून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. तसेच त्यांच्यावर आपल्या धर्माचे अनुयायित्व स्वीकारण्याची कधीही बळजबरी केलेली नाही. हे तेंव्हा सुद्धा झालेले नाही जेंव्हा आपल्या या मातृभूमीवर, आजपासून सत्तर वर्षांपूर्वी अविचाराने एक रेघ मारून तिचे दोन तुकडे करण्यात आले.
झाले... ते झाले.
परंतू,
आता आपण सजग आणि जागृत होण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण, आपल्या मूळ ‘सर्वसामावेशक’ स्वभावाला छिन्नभिन्न करण्याचे, काळाच्या दीर्घ पटलावर सुरू असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहेत.
होय.
आपला प्रवास, नकारात्मकतेकडे फार वेगाने होत चाललेला आहे. भौतिकतेच्या आकर्षणामुळे वैयक्तिक स्वार्थपूर्तीसाठी आणि क्षणभंगूर समाधानासाठी आपणच आपल्या जीवनपद्धतीला, आपल्या परंपरांना, आपल्या धर्मांना, आपल्या आदर्शांना, आपल्या मान्यतांना, आपल्या जगण्याला, आपल्या असण्याला, आपल्याच ‘अस्तित्वाला’…. झपाट्याने नाकारत चाललो आहोत. होय. आपणच आता बुभुक्षित *लांडगे* होत चाललो आहोत. ‘बुरसटलेपणाच्या नावाखाली’ आपण मांगल्याचेही लचके तोडत सैरावैरा धावत सुटलो आहोत.
हे सगळे, आपल्याला कुठेतरी थांबवायलाच हवे.
आपल्या ‘सर्वसमावेशकत्वाचा’ गैरफायदा घेऊन आपल्याला भ्रमित करणार्यांची, आपल्याला ‘सगळंच नाकरण्याची’ सवय लावू इच्छिंनार्यांची, बुद्धिवादाच्या नावाखाली स्वत:चा ‘तथाकथितपणा’ आपल्या अंगी भिनवू पहाणार्यांची स्पष्ट ओळख, आता आपण करून घ्यायला हवी. *मानवाच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.*
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, का बरे हे लोक आपला ‘स्वीकारणे’ हा मूळ स्वभाव मिटवण्यासाठी हजारभर वर्षांपासून असे सातत्याने झटत आहेत? आपण त्यांचे असे काय बरे बिघडवले आहे? आपण त्यांचे नेमके काय घोडे मारले आहे?
काहीही नाही.
जंबुद्विपिय मानवाने कुणाचेही काही वाईट चिंतल्याचा पुरावा, ढीगभर इतिहास उकरून काढला तरी टिचभरही सापडणार नाही. आपण कधीही कुणावरही आक्रमण करण्यास गेलेलो नाही. आपण आपल्या देशाच्या वैभवात भर घालण्यासाठी कधीही कुणाला लुटलेले, गुलाम केलेले नाही. आपण आपले वैभव स्वबळावर कमावले, कमावत आहोत. आपण भौतिक सुखांसाठी तर जाऊच द्या, परंतू ‘सर्वोच्च ज्ञानाची’ लालूच दाखवून देखील कुणाला आपले ‘धर्म’ स्वीकारण्यास भाग पडलेले नाही. आपण आपल्याकडचे जे काही दिले, ते समोराच्याला ‘आहे त्या अवस्थेत’ स्वीकारून देऊन टाकले आहे.
मग तरीही हे लोक आपला ‘सर्वसमावेशक स्वभाव’ का उध्वस्त करू पहाताहेत?
कारण,
‘नाकारणे’ हा त्यांचा स्वभाव आहे. मग ती जीवनपद्धती असो, रहाणीमान असो की धर्म असो. आपण जोपर्यंत त्यांच्यासारखे होत नाहीत, तोपर्यंत ते आपले ‘आहे तसे’ अस्तित्व नाकारतच रहाणार. *‘नकारात्मकता कायम दुबळी असते आणि सकारात्मकता नेहमी श्रेष्ठ’* हे त्यांनाही माहिती आहे. आणि त्यामुळेच स्वत:चे हे दुबळेपण त्यांना कायम सलत असते. परिणामी, ते आपल्यालाही त्यांच्यासारखे दुर्बल बनवण्याचा कायम खटाटोप करत आले आहेत.
खरेतर,
‘स्वत:ला दुर्बल समजणे’ हे त्यांचे अज्ञान आहे आणि त्याबद्दल, आपल्या मूळ स्वभावानुसार आपल्याला त्यांच्याबद्दल ‘करुणा’ वाटत आलेली आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की, ‘तुम्ही अमृताचे पुत्र आहात’. आणि यातले ‘तुम्ही’ हे फक्त जंबुद्विपियांसाठी नाही तर या वैश्विक रचनेत मानव म्हणून अस्तीत्वात येणार्या सर्वांना उद्देशून म्हटलेले आहे, हे आपण सहज समजू शकतो. *आता, वेळ आली आहे, आपली ही ‘समज’ संपूर्ण विश्वभर घेऊन जाण्याची.*
परंतू,
हे आपण अतिशय सहज करू शकू, असे समजणे ही आपली घोर *अंधश्रद्धा* ठरेल.
कारण,
हे करण्यासाठी आधी आपल्याला, आपल्या आत ‘नकारात्मकता पसरवणार्या विषाणूंची स्पष्ट ओळख’ करून घ्यावी लागेल. या विषाणूंचा प्रभाव व वाढ रोखणार्या औषधांची निर्मिती व फवारणी करावी लागेल. तसेच, या विषाणूंचे परिवर्तन आपल्या शरीरास पोषक ठरणार्या जिवाणूंमध्ये करून घ्यावे लागेल.
*‘तथाकथित बुद्धिवादी’* या वर्गात मोडणारे हे विषाणू कोण आहेत? त्यांचे कार्य नेमके काय आहे? व ते कसे चालते? त्यांच्या या कार्याचे नेमके परिणाम काय होतात? आपणच या विषाणूंचे ‘संक्रमक’ कसे बनत चाललो आहोत? या सर्व बाबींचा विचार, या लेखमालिकेतील पुढच्या भागापासून करूया. हा विचार करत असताना, ही लेखमालिका लिहिण्यामागील भूमिका मांडतेवेळी म्हटल्याप्रमाणे कायम लक्षात ठेवायचे ते एवढेच की,
‘ज्या पृथ्वीतलावर मानवाचे अस्तित्व आहे त्या धरतीमातेला क्षणभराच्या अवधीमधे नष्ट करता येईल, इतके अणुबॉम्ब मानवानेच निर्माण करून ठेवलेले असताना 'शस्त्रांद्वारे खेळल्या जाणाऱ्या लढाईला तसाही काही अर्थ राहिलेला नाही'. तरीही मानव एकमेकांविरुद्ध लढणारच नाही, अशी भाबडी आशा बाळगण्यातसुद्धा काही शहाणपण नाही. त्यामुळे, आजच्या काळात मानवाला लढायचेच असेल तर, त्याने आपल्या बुध्दीने लढणे आवश्यक आहे. आपल्या बौद्धिक लढाईमुळे निर्माण होणाऱ्या गदारोळाचा विचार करता मला वाटते की आपण, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या बुध्दीमत्तेवर सार्थ विश्वास ठेवायला हवा. आपण हा विश्वास ठेवायला हवा की आपले वंशज, आपल्या पूर्वजांच्या विविध मत-मतांतरचा अभ्यास करून त्यातील ‘योग्य तेच’ उचलतील.
नमस्कार