भाऊबिजेसाठी भावाला पत्र


पत्रलेखन
                     शीला बिनगे(साद)
                     'शारदेय'
                     मेन रोड, परतुर
                     ता परतुर जि जालना
                     431501
                     दि. 23/10/2019
प्रिय दादू ,
सप्रेम वंदे.
मोबाइलच्या जमान्यात माझे पत्र पाहून कदाचित तू मला वेडी ठरवशील पण मला माहीत आहे की तुला माझी पत्र वाचायला , टपोरं मोत्यासारखं हस्ताक्षर डोळ्यांनी वेचायला आवडतं ते. म्हणून मीच ठरवले की पत्र लिहून तुला खुश करू.
आजच शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्या अन् तुला पत्र लिहायला घेतले.तुला सुट्या लागल्या की तूही लगेचच निघ . भाच्यांसाठी खूप सारे फटाके आणि भेटवस्तू घेऊन ठेवल्या आहेत. त्यांना कधी देतेय असे झालेय बघ.
नोकरीच्या निमित्ताने तू विदेशी गेलास . सुखसोयी , भौतिक सुविधा सारं काही तुझ्या पायाशी लोळण घेतंय. तुझं चौकोनी कुटुंब अगदी मजेत आहे हे पाहून बाई(आई)सह आम्ही सारेजण समाधानी आहोत . तरीही तुला डोळे भरून, समोर बसवुन प्रत्यक्षात बोलल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. त्यामुळे तू लगेचच निघायची तयारी कर.
दादाला (वडील) जाऊन 2 वर्षे झालीत. बाई एकटी पडलीय आणि तूही विदेशी आहेस. तिला मी आमच्याच् घरी ठेवलंय पण तिला सारखी तुमची ओढ वाटते . तुम्ही येणार म्हणून तिने तयारी सुरु केलीय . झेपत नसतानादेखील तिने सगळे घर झाडून स्वच्छ केले . वाण्याकडे किराणा सामानाची यादी दिलीय. आकाशकन्दिल , पणत्या, फटाके सारं काही आणून ठेवलंय. आता तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलीय. त्या म्हाताऱ्या डोळ्यांची आस पूरी कराया लवकर ये रे दादू.
अरे !!! महत्वाचे तर लिहायचे राहूनच गेले की . आता यापुढे दरवर्षी भाऊबीजेसाठी मी माहेरी येणार नाही. तर तुम्हीच सर्वजण माझ्याकडे यायचय. फराळ, गोड- तिखट जेवणे सारं काही माझ्याच घरी करू. त्यानंतर मग वहिनीला माहेरी जाता येईल . तिलाही तिच्या माहेरी 2- 4 दिवसासाठी जाऊन येऊ दे. बाई कितीही मोठी( मानाने , वयाने , पदवीने) झाली  तरी तिला माहेराची ओढ असतेच रे.
बरं, आता लेखन थांबवते. तू कधी निघणार आहेस ते कळव म्हणजे मी आमच्या ह्यांना तुला घ्यायला पाठवते. वहिनीला माझा नमस्कार सांग आणि भाचे कंपनीला गोड पापे.
तुझी छोटी
शीला
ता.क.= गुड्डीला मुलगी झालीय . बाळ गुटगुटित आहे.

प्रति,
संतोष अम्भुरे
आर.के .इंटरनॅशनल स्कूल,
निअर साऊथ कॅनॉल,
टोकियो , जपान

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.