निरोप घेताना...

काही निरोप घ्यावेसेच वाटत नाहीत...काही संवाद अपूर्णच राहतात! खूप काही सांगायचं राहून जातं..या वेगळ्या होणाऱ्या वाटा एकत्र पुन्हा कुठे भेटतील याची पुसटशीही कल्पना नसते आणि अशा अंधुक वाटेवर आपण अगदी निशब्दपणे निरोप घेतो. अगदीच निशब्द नाही पण शब्द जड होतात आणि मनातलं मनातच राहून जातं....आणि तिथून पुढे सुरू होतं आठवणींवर जगणं...!

या आठवणींची पण मग चटक लागत जाते आणि मग या आठवणींपायी मन उगाच हळवं होतं.
कधीकधी वाटतं निरोपाची वेळ समीप आली की बोलून टाकावं सगळं मनातलं आणि मोकळं व्हावं पण तसं होत नाही. शब्दांना वाटच सापडत नाही. कदाचित आपणच ती वाट अडवतो. शेवटचा तो निरोपक्षण जसा जगायला हवा तसा जगतच नाही आपण....काहीतरी राहूनच जातं नेहमी!

आताही काहीतरी राहिलंय. कदाचित नसेलही राहिलं पण तरी हुरहूर लागली आहे मनाला. काहीतरी विसरतेय का मी? की सगळंच विसरलीये मी इथे? भिंतींवरच्या आठवणींच ओझं इतकं झालंय की पुढच्या क्षणी दाटून आलेला हुंदका फुटेल पण मी सावरलंय स्वतःला... सावरतीये! कारण दुसरा कोणताच मार्ग नाहीये समोर...

वाट अंधुक आहे की अश्रुभरल्या डोळ्यांनी ती अंधुक दिसतेय हेच कळत नाहीये. या क्षणी फक्त सगळं दाटून आलंय! म्हणून कदाचित शब्द अपुरे पडतात आणि निशब्द भावना उरतात. त्या भावना ज्यांना कळतात ते आपले आणि नाही कळत ते? तेही आपलेच!
कारण निरोप घेताना सगळेच आपले वाटतात. कोणालाच परकं करत नाही आपण अशा क्षणी!  गुंतत जातो आपण गहिऱ्या आठवणींच्या जाळ्यात.

यातून बाहेर येण्याचा मार्ग तितकासा अवघड नाहीये पण वळण मात्र नाजूक आहे. एकाकी नाही वाटते मला पण हरवल्यासारखं नक्की वाटतंय. वाट चालणं अवघड नाहीये कदाचित पण आठवणींच ओझं घेऊन ती शोधणं यात खरी कसरत आहे.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.