वर्षाराणीस पत्र

काल्पनिक पत्रलेखन

वर्षाराणीस पत्र
प्रेषक,
शीलू
चिंबसेनाप्रमुख
दुष्काळवाडी
रणरणपूर.

प्रिय वर्षाराणी,
मला तू जाम आवडतेस बाई.तुझ्यासोबत खेळताना ,भिजताना नि गारा वेचताना खूप खूप मज्जा येते. पण तू काही वेळेवर येतच नाही. नेहमीच वाट पाहायला लावतेस.
तुझ्या येण्यानं सारी सृष्टी आनंदात न्हाऊन निघते .झाडे - वेली,पशू ,पक्षी सर्वांची तू तहान भागवतेस. शेतकरीदादा तर तुझी आतुरतेने वाट बघत असतो. आमची चिंबसेना तर आईचा मार आणि बाबांचा ओरडा हसून सहन करतो आणि लपून का होईना तुझ्याशी खेळायला येतो.तू मात्र येतच नाहीस .आम्ही फक्त वाटच बघत बसतो.  
आता तरी लवकर ये . आम्हा सर्वांनाच तू हवी आहेस. आणि हो ........ आलीस तर आनंदाने ढगांचा ताशा बडवत ये. सगळ्यांना सुखाच्या बरसातीत भिजवून टाक. आमचा राग-राग करू नकोस . हसणारे संसार महापूरात वाहून नेऊ नकोस गं बाई!!!!!
बरं ,आता मी पत्र पूरं करते. चिंबसेना कागदी होड्या बनवण्यासाठी मला बोलवत आहे . मी जाते.
तू मात्र लवकर ये गं वर्षू !!!!

तुझी बालमैत्रिण
शीलू

प्रति,
वर्षाराणी
गारवा सदन
चिंब गल्ली
पाऊसगाव

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.