जीवन

       जीवनाची धडपड ही काहीतरी प्राप्‍त करण्यासाठी असते.  माणूस हा काही तत्त्व, ध्येय, अर्थ जीवनात जोडत असतो.  ते प्राप्‍त करण्यासाठी जीवन धडपडत असते. निव्वळ स्वप्नसृष्टीत वावरणे म्हणजे मूर्खपणा आहे. ध्येयवादी वृत्तीने कार्य करत असताना स्वप्नाळू श्रद्धा उपयोगी पडत नाही. जीवन हेच मुळी जुन्याचा बोध व नव्याचा शोध आहे. पूर्वानुभवातून बोध घेऊन वर्तमान व भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

      आम्हाला शाळेत नववी नंतर मराठी मधे गद्य आणि पद्य यासोबत स्थूलवाचन नावाचा एक नवीन प्रकार आला होता. एकदम पक्के आठवत नाही पण नववीत की दहावीत ( SSC मार्च 2008) त्या स्थूलवाचनात टोकियो, गोव्याचा शिमगोत्सव, बीजिंग, मॉस्को अशी 4-5 प्रवासवर्णने होती. त्यात अभ्यासात असलेले यशवंतरावांचे रशियावर असलेले ' शांतिचितेचे भस्म'  हे प्रवासवर्णन अजून मला आठवते.या प्रवासवर्णपर आत्मलेखात त्यांची जीवनदृष्टी आणि चिंतनपर विचार त्यांनी काव्यात्मक शैलीत मांडले आहेत.

''लहानपणी मी संगमावर बसत असे.  कोठून तरी येणारे आणि कोठे तरी जाणारे ते 'जीवन' मी रोज पाहात असे.  कोणासाठी तरी ते धावत होते.  त्यात खंड नव्हता.  त्या 'जीवनाला' एक लय होती.  पण ते लयाला गेलेले मी कधीच पाहिले नाही.  ते जीवन नित्य नवे होते.  त्याचा जिव्हाळा कधी आटला नाही.  जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते कधीच जीर्ण होत नाही.  चंद्र कधी जुना होत नाही.  सूर्याला म्हातारपण येत नाही.  दर्या कधी संकोचत नाही.  यातील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे. अनंत युगे लोटली तरी विनाश त्यांच्याजवळ पोहाचलेला नाही.  काळाने त्यांना घेरलेले नाही.  त्यांचा कधी कायापालट झाला नाही.  स्थित्यंतर नाही.  ते निश्वसन अखंड आहे.''  असे विचार त्यांनी रशियाच्या दौर्‍यावर असताना तेथील मातीत हिंडत असता दिगःमूढ मनःस्थितीत काढले आहेत.

      राजकारणाला साहित्याची सोनेरी किनार देणारे यशवंतराव चव्हाण मला वंदनीय वाटतात

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.