Image

'माझ्या अस्तित्वाची पाऊलवाट'
(लेख स्पर्धेतील ऊत्कृष्ट  ठरलेला हा लेख)

माणसाचं मन अस विचित्र अाणि लोभी असत की देह ठेवला तरी आपल अस्तित्व अापल्या मुला बाळांच्या नातवंड पंतवंडाच्या रुपानी ते शिल्लक राहावं अस वाटतं त्याला. अापलं कुळ आपल गोत्र अापलं घराण चालू राहिलं की मरणोत्तरही  वारसा रुपाने अस्तित्वात असणार आहे अशी
अंत्यसमयीची भावना असते.
तस तर अापल्या या जगातल्या अस्तित्वावरच आपलं प्रेम असत!म्हणून तर माणूस मरणाला घाबरतो.

 खर तर अापल्या अस्तित्वाच्या पाऊलवाटेची सुरवात होते ती अापल्या कुटूंबातल्या  अमक्याचा मुलगा / मूलगी या स्थानाने.  अापलं नाव , वडिलांच नाव(यात अाईच नाव अजूनही मधे लावायची प्रथा नाही याचा खेद अाहेच मनात) अाडणावं,आपले कुटूंब, अापली भावंडे या अापल्या  अस्तित्वदर्शक अशा  वाटा, ऊपवाटा पाऊलवाटा असतात असतात.
तशी बालपणातली माझी पााऊलवाट फारशी हिरवळीची , मृदू नव्हती मात्र!स्वातंत्र्य प्राप्तीच्या वाटेवर चालताना बालपणीच अाई वडीलांच घर , माया , अासरा  सोडलेल्या ,एककल्ली, तापट अाणि अापलं तेच खरं करायची सवय असलेल्या माणसाच्या शिस्तीत राहण सोप नव्हत माझ्यासाठी! 'मोडेन पण वाकणार नाही'  म्हणून  वारंवार अगदी दर दिवाळीच्या तोंडावर नोकरीवर लाथ मारणार्‍या माझ्या वडिलांना कित्येकदा  अामच केवळ तीन माणसांच कुटूंब पोसणही अवघड जायच. अक्षरश: 'पोटासाठी दाही दिशा' याचा प्रत्यय मला आणि आईला पावलो पावली यायचा.दरवर्षी नवी नोकरी नवं गाव! कुठल्या गावच्या घरात पाणी नाही तर कुठे वीज नाही, कुठे कुडाच्या भिंती तर कुठे शेणामातीची जमीन. त्यात अनेकदा दरमहा काहीतरी नक्की पगार हाती  यावा म्हणून घरापासुन लांब राहून   मिळेल ती नोकरी करणारी अाई! त्यामूळे घरातली स्वयंपाकीण,  मोलकरीण , पाणक्या  सगळ्या भुमिका  लहानपणापासूनच करायची मी. अगदी विहीवरून कावडीनी पाणी भरणं, कोसभर अंतरावरच्या गावच्या हौदावर धुणं पाणी करायला जाण, जमिनी भिंती सावरण, चुलीला पोतेर घालणं,  रोज कंदिल पुसणं , रेशनला रांग लावून निकृष्ट धान्य अाणून त्याचा स्वयंपाक करणं सगळं , या सगळ्या चक्रातूनच लांबवरचु शाळा गाठणं,  अाणि मग जमेल तसा अभ्यास! कष्ट पडले याचं वाईट नाही वाटत मला ! ऊलट या कष्टांनी मला कणखर बनवल. येईल त्या परिस्थितीला धडक मारून ऊलथवून लावायच प्रशिक्षणच होत ते! मला जीवनातल्या  सर्व प्रकारच्या चढ  ऊतारात त्याचा ऊपयोगच झाला! पण एक खंत मात्र कायमची आहे मनात. या विपरीत दिवसांना तोंड देताना ना माझ्या समवेत आई होती ना कोणी पुढच पाठचं भावंड. कुटूंबातील तिघांची  तोंड तीन दिशांना! असो.

अापली अशी स्वत:ची वेगळि व ज्याला 'प्रतिमा दर्शक' म्हणता येईल अशी वेगळी पाऊलवाट  अापण चालू लागतो  ती कुटूंबाचं बोट सोडून शालेय शिक्षणाला आरंभ केल्यावर ! आपली शााळा ,तिथले शिक्षक,वर्गमित्र मैत्रीणी
सहाध्यायी यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संबंध येऊ लागले की अापलं अस्तित्व अापण कळत नकळत दाखवू लागतो. अंगात फारच  कणखरपणा आणि साहस असल्याने मी शाळेत मात्र बर्‍यापैकी स्वत:ला स्थापीत करायची. अगदी अकरावी मॅट्रिक पर्यंत अाठ गांव अाणि सात शाळांच्या परिसरांत वावरले तरी! कधी खेळ, कधी चित्रकला ,कधी वक्तृत्व , भाषा , नियतकालीक यातून चमक दाखवत! गणित मात्र चांगलाच वीक पाॅईंट!शाळा संपल्यावरच त्याचा पिच्छा सुटला आणि भाषा व साहित्याच्या गळात गळा झाला!

शिक्षणक्रम , परिक्षा व तिचा निकाल , खेळ , कला या शिक्षणाखेरीज अन्य व्यक्तिविकास ऊपक्रमात सहभागी होऊन मूल अापलं स्वतंत्र अस्तित्व  विकसित करत असत.
 
   मी माझ्या अस्तित्वाची अन्य मैत्रिणींपेक्षा जरा  वेगळी अशी पाऊलवाट  चालायला लागले ती शाळेबरोबरच  अन्य क्रिडामंडळातील सहभागाने अाणि मुख्य म्हणजे मला घडवणारी 'राष्र्टसेवादल पुणे' या देशप्रेमी, समतावादी व चारित्र्य घडवणार्‍या संस्थेबरोबर! एस .जोशी. ऊर्फ अण्णा , बापुसाहेब काळदाते, भाऊसाहेब मराठे , अनूताई लिमये, ग.प्र प्रधानसर , साधना साप्ताहिकाचे अाधारस्तंभ यदूनाथजी थत्ते , माझी मावशी व  अाधी स्वातंत्र्य सैनिका अाणि नंतर अाजन्म समाजसेविका म्हणुन नव्वदीतही कार्यमग्न असणार्‍या  विमलताई गरूड ,अनेक अादर्श व अांतर्बाह्य पारदर्शी, निर्मळ , देशप्रेमी, समाज बदलू पहाणारी व्यक्तीमत्व! अाम्हा लहान मुलांच बोट धरून अाम्हाला अारोग्य , सभाधीटपणा , कला ,अभिनय , सामाजिक ऊपक्रमात सहभागी करून घ्यायची! त्याग,  समर्पण, सहअनुभूती, जातीभेदाला थारा न देणं, विज्ञाननिष्ठा, समानता असे अनेकानेक  स्ंस्कार या सेवादलानी घडवले माझ्यावर!
या अशा वेगवगळ्या वाटा जोडत  द्विपदवीधर होता होता मला माझा मनाजोगता  जोडीदार  निवडता आला! लग्नाला संमती देताना वेगळी जात अाणि शाकाहारी  मौंसाहारी हा मोठा फरक अाईला डाचत होता .पण या वेळी मात्र वडिल  पाठीशी राहिले अाणि संसार  व नोकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू  झाली.शैक्षणिक क्षेत्रातील  नोकरीने अपार आनंद दिला . सरकारी व अनूदानप्राप्त सस्थेतील  आरक्षणाच्या   धोरणामुळे मोठ्या  संधींपासून  वंचित राहवं लागल मात्र! लायकी असुनही पदं मिळाली  नाहीत! पण मी अनेक ऊपक्रम राबवले. मुलांना अनेक प्रकारे घडवता आले.याचं समाधान मोठ आहे. मुलांना  घडवताना मी दैखील घडत गेले. वाचत लिहीत नव शिकत राहिले. कथासंग्रह कविता संग्रह प्रसिद्ध झाले. अनेक बक्षिस अनेक पुरस्कार मिळाले.

माझ्या अस्तित्वाची पाऊलवाट पुढे  राजमार्ग झाला. दोन्ही मुलं ऊत्तम शिकली. कर्तृत्व गाजवतायत. अाम्हाला ऊभयतांना अाजी अाजोबांच प्रमोशन मिळालं. माझ्या सासुबाई सासरे अाणि माझे अाई वडिल यांच्या बाबतची सारी कर्तव्ये पार पाडण्याची अार्थिक व शाररिक क्षमता देवानी दिली.

अाज मितीला अर्धअधिक जग हिंडून  झालय. थरारक खेळाची मजा मी सत्तरीच्या ऊंबरठ्यावरही घेते. अाणि  काय  हव!
सपत्तीचा लोभ नसल्याने अनेक गरजुंना व संस्थाना मदत करण्यात व सामाजिक कार्यात सहभागी होतो.
अशी ही वाटचाल! अापल्यामागे काय राहिल  कसं राहिल याची चिंता तरी मग कशाला! सर्वेपी सुखीन:संतू  सर्वे  संतू निरामयह: हीच प्रार्थना सर्वांसाठी देवाकडे

अंजना कर्णिक, माहिम, मुंबई