Image

अविवेक अंनिसचा - ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------

by - योगेश रंगनाथ निकम
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com 
06 डिसेंबर 2018

याआधीच्या लेखात आपण, “अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?” या मुख्य प्रश्नाच्या आधारे निर्माण होणार्‍या उप-प्रश्नांची उकल केली, तसेच वरील प्रश्न विचारणार्‍या हिंदूंना “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो.” या चौकटीत बसवणे चुकीचे कसे आहे ते सुद्धा पहिले.

आता आपण “अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?” हा प्रश्न विचारण्यामागे जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपण मागच्या लेखात पाहिलेले, ‘महाराष्ट्रातील जिंतूर येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभुमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला, तसेच त्यावेळी सामिष व निरामिष भोजनाचा आस्वाद घेतला’ हेच उदाहरण पुन्हा समोर ठेऊ. अंनिसद्वारे हा कार्यक्रम घेतल्यानंतर बहुतांश हिंदू लोकांमध्ये ज्या भावना निर्माण झाल्या, त्यातील फक्त तात्विकदृष्ट्या चर्चेस योग्य असलेल्या भावना शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे.

1. समजा, (हे फक्त समजायचे आहे. ईश्वरकृपेने कुणावरही वाईट प्रसंग न येवो) ज्या लोकांनी स्मशानभूमीत जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला, त्या व्यक्तींच्या घरातल्या जवळच्या माणसाचा मृत्यू होऊन अंत्यविधी झालेला आहे. अशावेळी हे लोक अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अंत्यविधी झालेल्या ठिकाणी एखादा असाच शाकाहारी – मांसाहारी भोजनाचा कार्यक्रम ठेवणार का? ठेवला तर त्याचा मोठा गाजावाजा करून प्रसिद्धी करणार का?

ते असे काही करणार नाहीत अशी अपेक्षा आहे व त्यांनी असे काही करूही नये, अशी त्यांना एक मानव म्हणून विनंतीसुद्धा आहे. कारण असे केल्याने कुठलीही विज्ञाननिष्ठता सिद्ध होणार नसून, फक्त भावनाहीन अविवेकाचेच प्रदर्शन होईल. तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की, ज्यावेळी जिंतूरच्या स्मशानभूमीत असा उपद्व्याप केला गेला, त्यावेळी इतर कुणाच्यातरी जिवलगांच्या निधनामुळे त्याचवेळी स्मशानात अंत्यसंस्कार होत असतील किंवा अंनिसचा कार्यक्रम होण्याच्या थोडावेळ आधी झालेले असतील किंवा या कार्यक्रमानंतर झाले असतील. त्या इतर कुणाच्यातरी भावनांचे काय? ज्याच्या जाण्यामुळे एखाद्याला दु:ख झाले आहे अशा गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाजूला जळत असताना, कुणीतरी बिनबुडाचा आनंद मिळवण्यासाठी शेजारीच बसून जेवत असल्याचे बघून त्या मृत व्यक्तीच्या आप्तेष्टांना काय वाटले असेल?

इथे मी मृताच्या भावनांबद्दल बोलत नाहीये. जीवंत हाडामासांच्या माणसांबद्दलच हे सगळे चालले आहे. त्यामुळे यापुढे ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली’ ‘वाढदिवस, काव्यमैफिल’ अशा प्रकारे स्मशानाशी संबंध जोडण्याआधी थोडा विवेकी विचार केला जाईल अशी रास्त अपेक्षा आहे. बाकी आनंद साजरा करण्याबाबत कुणाचेही दुमत नाही. परंतु तो कुठे? कधी? कसा? साजरा करावा याविषयी काही सामाजीक बंधने मानवाने स्वत:च्या विवेकाने स्वत:वरच घालून घेतलेली आहेत. समाजभान असणार्‍यांनी ती पाळावीत अशी अपेक्षा असते. तशी अपेक्षा नसेल तर रेव्ह पार्ट्यांवर धाडी घालण्यात तरी काय अर्थ आहे? ते लोकही त्यांचा आनंदच साजरा करत असतात की. आजच्या काळात ज्या हक्काबद्दल मोठया आवाजात ओरडून सांगितले जाते, त्या ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या हक्काचा उपभोगच तर हे लोक घेत असतात. याव्यतिरिक्त, ‘सामाजीक बंधने पाळली पाहिजेत, या समाजमनावर असलेल्या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचे कार्य आपण करत आहोत’ अशी या लोकांची श्रद्धा असल्यास त्यात चूक काय ठरेल?

2. ‘हिंदू स्मशानभूमीत’ हा प्रकार घडला असल्याने त्याविरोधात बोलणारे बहुतांश लोक हे हिंदुच असणार हे उघड सत्य आहे. इतर धर्मीय मृतांचे अंत्यविधी जेथे केले जातात अशा ठिकाणी जर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला असता तर याच प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या का? ‘आल्या नसत्या’ असे ज्यांना वाटत असेल त्यांनी प्रयोग करून पाहायला व आपल्या प्रयोगाच्या मोठमोठ्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करून आणायला हरकत नाही. अर्थात, आम्ही हिंदू असल्याने आम्हाला इतर धर्मीय बांधवांच्या श्रद्धांविषयी आदर आहे व त्यामुळे वरील प्रयोग एक आव्हान म्हणून स्वीकारण्यास आम्ही कुणालाही सांगत नाही आहोत.

3. हिंदू धर्मात आत्मा मोक्षपद मिळवून किंवा पुनर्जन्म घेण्यासाठी, निघून गेल्याने मृत झालेल्या देहांवर अग्निसंस्कार केला जातो. उरणारी राख सुद्धा वाहत्या पाण्यात विसर्जित केली जाते. त्यानंतर मानवाचे या भूतलावर भौतिकदृष्ट्या काहीच उरत नाही. जे काही उरते ते त्या मानवाने केलेल्या कार्याच्या व बर्‍या-वाईट आठवणींच्या स्वरूपात उरते. असे असताना हिंदू स्मशानभूमीत भूते - खेते तरी कुठून सापडणार?

जर अंनिसचे कार्य ‘भुता - खेतांबद्दलची जनमाणसात असलेली भीती व अंधश्रद्धा घालवणे’ यासाठीच असेल, तर त्यांनी ज्या ठिकाणी मृतदेह पुरले जातात अशा अंत्यविधीस्थळी जाणे उचित ठरणार नाही का? तेथे किमान जमिनीखाली पुरलेले मृतदेह तरी बर्‍यावाईट अवस्थेत अस्तीत्वात असतात. याव्यतिरिक्त, ‘न्यायाच्या दिवसापर्यंत तेथेच शांतपणे पडून राहण्याची संकल्पनाही आहेच.’ त्यामुळे, आपापल्या देहासह आत्मा किंवा असेच काहीतरी जिथे थांबून आहे, तेथे जाऊन आपले प्रयोग केल्यास ते अधिक सिद्धतेने मांडता येतील, असे अंनिसवाल्यांना वाटत नाही का?

बरं हे वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही योग्य होईल. कारण, ‘जेथे काहीच शिल्लक उरत नाही’ अशा ठिकाणी जाऊन ‘तेथे काहीही, अगदी भूतेही नाहीत’ हे सांगण्यात काय विशेष व वेगळेपण आहे? याउलट, ‘जेथे अजून बरेचसे काही शिल्लक आहे’ अशा स्थळी प्रयोग करून ‘तेथे काहीही नाही’ हे सिद्ध करून दाखवण्यात खरा वैज्ञानिक शहाणपणा नाही का?

पुन्हा एकदा हिंदू म्हणून इतर धर्मियांच्या श्रद्धांबद्दल संपूर्ण आदर व्यक्त करत, आम्ही कुणालाही असे प्रयोग करण्याबद्दल आव्हान देत नाही. कारण आमच्या दृष्टीने यातून सकारात्मक असे काहीही सध्या होत नसून, मानवी बुद्धीचा अविवेक फक्त दिसून येतो.

4. ‘स्मशानभूमीत भूत, प्रेत, आत्मे भटकत असतात अशा भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी’ जर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानात भोजन घेतले असेल तर, आणखी एक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे, भूत-खेतांच्या कल्पना फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत का? माझ्या माहितीनुसार तरी त्या सर्वच धर्मांमद्धे समान आहेत. विविध धर्म-पंथांमधील लोकांमधे देवाच्या संकल्पनेत जरी भेद असले तरी, भूतांवर एकमत आहे. कुणाचीही भूते प्रार्थनास्थळांमधून बाहेर न पडता अंत्यविधीच्या म्हणजे स्मशान, कब्रस्तान, सिमेंट्री इत्यादी स्थानांमधेच वास करत असल्याचे समजले जाते. अर्थात, मी भूतांचा जाणकार व समर्थक नाही आणि समर्थन द्यावे असे सांगण्यास मला कुणाचेही भूत आतापर्यंत भेटलेले नाही. पण मी कादंबऱ्यांमधून या संकल्पना वाचल्या आहेत, मराठी-हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून पाहिल्या आहेत. आपणासही भूतांचा एवढाच आणि असाच असाच अनुभव असेल.

सांगायचे एवढेच की, जर भूतांचा प्रश्न हा एवढा वैश्विक आहे तर मग 'अंधश्रध्दा निर्मुलनासाठी स्मशानभूमीसारख्या हिंदू प्रतिकांनाच का निवडले जाते?' हा हिंदूंचा साधा सरळ व स्वच्छ प्रश्न आहे.  येथे आपणाला अंनिसच्या कार्यामुळे काही हिंदूंमध्ये जी अस्वस्थता पसरते त्या अस्वस्थतेच्या कारणांपैकी एक कारण मिळते. ते कारण म्हणजे, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नेहमी नेहमी हिंदूंच्याच प्रतिकांचा आधार घेतला जातो’ हे होय.
स्मशानभूमीतील वाढदिवसाच्या उदाहरणाचा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की, हिंदूंची अस्वस्थता योग्य आहे. कारण, इतर धर्मांच्या प्रतिकांचा आधार घेऊनही याच प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे उदाहरण देता आले असते, परंतु तसे झालेले नाही. या गोष्टींचा सुप्तरित्या होणारा परिणाम असा की, जेव्हा योग्य कारणासाठी हिंदू प्रतिकांचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन केले जाते तेव्हाही बर्‍याचश्या हिंदूंना ते अन्यायपूर्ण वाटू लागते. आता असे वाटणे योग्य की अयोग्य याचा काथ्याकूट करत बसण्यापेक्षा ‘अन्यायाची भावना निर्माण होऊ नये’ यासाठी काय करता येईल? याचा विचार करायला हवा. कारण, ‘अन्याय होतोय असे वाटणे’ हे वर्तमानात मोठ्या प्रमाणात जाणवणारे सत्य आहे व ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य’ यापुढेही पूर्वीच्याच प्रकारे चालू राहिल्यास ही भावना आणखी वाढत जाऊन त्याचे अजून विपरीत परिणाम दिसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या अनिष्ट परिणामांपासून आपल्या पुढच्या पिढ्यांना वाचवण्यासाठी ‘आज, विचार करायला हवा’.
असो.
'अंधश्रध्दा निर्मुलनासाठी हिंदूंच्याच प्रतिकांना का निवडले जाते?' याप्रश्नाचे उत्तर डॉ. दाभोलकरांनी आपल्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, हे उत्तर परिपूर्ण आहे असे मला वाटले नाही. कारण, ते उत्तर देताना हिंदू धर्माच्या एका अनोख्या वैशिष्ट्याचा विचार केलेला नाही. हे वैशिष्ट्य जगातील सर्व धर्मांच्या पाठी फक्त हिंदू धर्मामध्येच आहे आणि म्हणून ते ‘एकमेवाद्वितीय’ आहे. आपण या वैशिष्ट्याचा, त्याच्या सौंदर्याचा व त्या अनुषंगाने वरील प्रश्नासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या उत्तराचा ऊहापोह, पुढील लेखात करू.

तत्पूर्वी, याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?’ असा प्रश्न विचारणार्‍यांकडे “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो.” या चौकटीतून पाहणे ‘अविवेकी’ कसे आहे हे स्वत:लाच आणखी सुस्पष्टरित्या कळावे म्हणून अंनिसच्या कार्यकर्त्यांना पुढील अनोखा प्रयोग करता येईल. 

खरेतर मरणोत्तर देहदानाची इच्छा व्यक्त करणारा फॉर्म मी भरलेला आहे. परंतू, भविष्यात हा प्रयोग करायचा असल्यास, माझा हा लेख म्हणजे कायदेशीर प्रमाण मानून माझा मृतदेह अंनिस कार्यकर्त्यांच्या हवाली करण्यात यावा. तसेच ते माझ्या मृतदेहाशी जे काही करतील करतील त्याला ‘विटंबना न मानता वैज्ञानिक प्रयोग मानण्यात यावा’ अशी इच्छाही मी व्यक्त करत आहे त्यामुळे या प्रयोगामुळे कुणीही आपल्या भावना दुखावून घेऊ नयेत. मी माझ्या घरच्यांनाही तसे सांगून ठेवतो व त्यांच्याकडून या प्रयोगात काहीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो.

‘स्मशानात जेवणे’ म्हणजे खरेच ‘अंधश्रद्धेचे निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोण रुजविणे’ असेल तर मग, जे भोजन ग्रहण करायचे आहे ते स्मशानातच तयार करण्यास तरी काय अडचण आहे? ते ही तिथेच उपलब्ध होणार्‍या अग्नीवर? अंनिसवाल्यांनी माझ्या चितेवरच भांडी ठेऊन त्यात आपले भोजन शिजवले व ग्रहण केले, तर पुढे ‘असे केल्याने माझ्या भुताची बाधा झाली नाही’ हे त्यांना वैज्ञानिकरित्या सिद्ध करता येईल. आणि मांसाहारच करायचा असेल तर बाहेरून मांस तरी कशाला आणायचे? माझाच मृतदेह त्यासाठी वापरता येईल की. वैज्ञानिकदृष्ट्या मांस शेवटी मांसच असते. मग ते एखाद्या कोंबडीचे असो अथवा दुसर्‍या एखाद्या प्राण्याचे असो वा माझे असो. त्याचा चवीष्ठपणा जवळपास सारखाच असेल, नाही का?

वाचकांनो आणि विशेषत: अंनिसच्या कार्यकर्त्यांनो, वरील प्रयोगात वैज्ञानिकदृष्ट्या काहीही अनुचित नाही. प्रश्न आहे तो फक्त मानव म्हणून आपल्याकडे असणार्‍या विवेकाचा. इतरांच्या विवेकाला साद घालण्याचा आपलाच मार्ग तर अविवेकी नाहीये ना? हे तपासायला हवे. कारण, आपण सध्या प्रयोगशाळेत ‘पेशी’ तयार करू शकतो त्यामुळे भविष्यात प्रयोगशाळेतच एखादा जीवंत माणूसही निर्माण करू शकतो, असे समजण्यास वाव असला तरी प्रश्न ‘आपण तसे करावे की न करावे एवढाच आहे’ आणि हा ज्याच्या त्याच्या ‘विवेकाचा’ किंवा ‘अविवेकाचा’ प्रश्न आहे. तो प्रत्येकाने आपापलाच सोडवायला हवा.