Image

     "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी "... खरंच ह्या ओळीने मन भारावून जातं  आणि डोळे आईच्या आठवणीने भरून येतात.  म्हणतात ना...  मुलं कितीही मोठी झाली तरी, ती आईसाठी लहानच असतात. मग ते आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत किंवा मग सुपरस्टार अमिताभ बच्चन. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई हि खूप जिव्हाळ्याची व्यक्ती असते.  किती नवलाची गोष्ट आहे ना ... देवाने सुद्धा जेव्हा या संसाराची रचना केली तेव्हा त्याने, बाईलाच  हि ताकद दिली मूल जन्माला घालायची. अहो नुसती माणसच नाही , तर जनावरांमध्ये मादीलाहि ताकद दिली मूल जन्माला घालायची. गाय सुद्धा जेव्हा आपल्याच पाडस्याला प्रेमाने चाटते ना तेव्हा खूप नवल वाटतं . अशी हि आई आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारं आईपण.

        आई होणे हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला खूप अनमोल क्षण . नऊ महिने ज्या जीवाला आपल्या गर्भात वाढवलं , त्याला प्रत्यक्षात समोर बघून आणि हातात घेऊन तिचे डोळे भरून येतात. खरंतर हा प्रवास तिच्यासाठी इतका सोप्पा नसतो. आणि आता तर करिअर, वर्क कलचर ह्यामुळे सगळंच थोडं अवघड होऊन बसलं आहे. मॉडर्न लाईफस्टाईल आणि एज फॅक्टर  मुळे तर कित्येक जणींना गर्भधारणेसाठी अडचण होत आहे. म्हणूनच तर हतबल होऊन IVF आणि Surrogacy चा निर्णय घ्यावा लागतो. त्यात देखील IVF ला लागणारा खरचं , ह्याने देखील ती स्त्री खूप खचून गेली असते. पण जेव्हा ते मुल जन्माला येतं  ना, तेव्हा तिचा आनंद गगनाला भिडणारा असतो. हि तर झाली वर्किंग वूमेन ची व्यथा . पण ज्या बायका घरीच असतात ना त्यांच्या वेगळ्याच समस्या. केवळ घरच्यांच्या इच्छे खातीर तिला हा निर्णय घ्यावा लागतो . आणि काही जणी तर अश्या असतात कि आपला देश सोडून परदेशी जावं लागतं,  आणि तो एकटेपणा घालवण्यासाठी मुल हव असतं . पण कुठल्याही स्त्रीने मानसिक आणि शारीरिक रित्या तयार असणे गरजेच आहे. 

      ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या ना, तर त्या  नऊ महिन्यात  त्या स्त्रीला खूप शारीरिक आणि मानसिक बदलावातून   जावं लागतं . बरं, आता प्रत्येकाचे गरोदरपण हे सारखे असते असं नाही.  काहींना  पूर्ण नऊ महिने खूप त्रास सहन करावा लागतो. काहींना काहीच त्रास होत नाही. त्यातल्या त्यात जी पहिल्यांदाच आई होणार असते आणि तेहि परदेशी,  तिला तर काहीच कळेनासं  होतं . अगोदरच ह्या सतत होणाऱ्या त्रासामुळे ती वैतागून गेलेली असते आणि मग हार्मोनल इम्बॅलन्स मुळे शारीरिक बदल तिला थोडं चिंतेत घालतात. खरंतर तिला खूप त्रास होत असतो ह्या सगळ्यांचा, पण तिच्या मनात कुठेतरी एक उत्सुकता असते आपल्या बाळाच्या स्वागताची. बाळ, जे अजून जन्मलं देखील नाही त्या बाळासाठी ती स्वप्न बघायला लागते.  त्याची काळजी देखील घ्यायला लागते. कित्येकदा तिच्या मनात हे प्रश्न निर्माण होत असतात कि होणारं बाळ मुलगा असेल कि मुलगी? जुळे झाले तर काय करणार?  तिचं पूर्ण जगच  बदलून गेलेलं  असतं. आपल्या येणाऱ्या बाळासाठी ती स्वतः मध्ये असलेले सगळ्याच वाईट गोष्टी सोडते . ती आपल्या बाळावर  गर्भात असल्यापासूनच चांगले संस्कार करायला लागते. म्हणतात ना आई हि बाळाची पहिली शिक्षक असते. 

                 बाळ  जसं जसं वाढत असतं ना , तसं तिला बाकीची साधी कामं करायला सुद्धा जड जायला लागतं . साधा पडलेला चमचा सुद्धा वाकून घेण्यासाठी तिला खूप कसरत करावी लागते . तिची रात्रीची झोप पण उडालेली असते.  पण तिला तिच्या गर्भात वाढत असलेल्या त्या बाळाची सतत जाणीव होत राहते.  आपल्या गर्भात वाढत असलेल्या बाळासोबत जेव्हा ती बोलते आणि ते बाळ तिचं आवाज ऐकून हालचाल करतं ना, तेव्हा तिच्यासाठी तो खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. 

      डिलिव्हरीची वेळ जशी जशी जवळ यायला लागते, तसं तिच्या मनात वेग वेगळे विचार घर करायला लागतात. त्यात अजून भर म्हणजे  नॉर्मल डिलिव्हरी कि C section. पण जेव्हा तिचं  बाळ  ह्या नवीन जगात डोळे उघडतं ना आणि तिला पहिला स्पर्श करतं ,तेव्हा तिला तिच्या मातृत्वाची जाणीव होते ,तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य.  एक पोकळी निर्माण झाली असते गर्भात. पूर्ण नऊ महिने झालेला त्रास सुद्धा तिला तिच्या बाळासमोर नाहीसा हॊतॊ आणि हे सर्व तिच्या आयुष्यातले सुंदरशे अविस्मरणीय क्षण बनतात.

मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

© सोनम राठोर